माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी व्यक्ती केली खंत ; रोटरी जळगाव स्टार्सचे पहिले पदग्रहण
जळगाव: रोटरीची जगात सेवाभावी संस्था म्हणून ओळख असून रोटरी जे प्रकल्प राबविते त्यांची देखभाल व्यवस्थित होते आणि ते यशस्वी देखील होतात असे सांगून शहरातील 25 टक्के स्वयंसेवी संस्था धंदेवाईक झाल्याची खंत माजी सुरेशदादा जैन यांनी व्यक्त केली. यावेळी जैन यांनी रोटरी जळगाव स्टार्सच्या नुतन टीमला जळगाव शहर सुंदर, स्वच्छ व सुशिक्षित करुन गतवैभव प्राप्त करुन देण्याचे आवाहन केले. मुंदडा व ललवानी यांना सार्वजनिक जीवनात त्यांनी रोटरीच्या माध्यमातून सेवा देण्याचा जो संकल्प केला आहे तो सिद्धीस जावो असा आशीर्वादही दिला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे 14 जुलै रोजी सकाळी पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन बोलत होते. याप्रसंगी माजी प्रांतपाल राजीव शर्मा, सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके, सल्लागार प्रसन्ना गुजराथी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नुतन अध्यक्ष व सचिवांना चार्टर सर्टिफिकेट, कॉलर व पीन प्रदान करण्यात आली. तर 56 व्यक्तींना क्लबचे सदस्यत्व कुटुंबियांसमवेत देण्यात आले. प्रारंभी रोटरी वेस्टचे माजी अध्यक्ष अनिल बोरोले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सोहळ्याची सुरुवात दिपप्रज्वलन व दर्शना जैन हीच्या गणेश वंदनावर आधारीत नृत्याने झाली. प्रांतपाल राजेंद्र भामरे यांच्या संदेशाचे सहप्रांतपाल डॉ. तुषार फिरके यांनी वाचन केले. सूत्रसंचालन वर्षा अडवानी यांनी तर आभार याजविन पेसुना यांनी मानले. राष्ट्रगिताने सांगता झाली.
अशी आहे नूतन कार्यकारिणी
शहरात नव्याने स्थापन झालेल्या सातव्या रोटरी क्लब ऑफ जळगाव स्टार्सच्या पहिल्या पदग्रहण सोहळ्यात 28 वर्षीय सागर मुंदडा यांनी अध्यक्षपदाची तर 26 वर्षीय करण ललवानी यांनी सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.नुतन अध्यक्ष सागर मुंदडा यांनी आगामी कार्याचा संकल्प व्यक्त करुन नवीन कार्यकारणीची घोषणा केली. त्यात उपाध्यक्ष योगेश कलंत्री, सहसचिव सचिन बलदवा, कोषाध्यक्ष सिद्धार्थ जैन, सार्जंट ऍट आर्म पुनीत रावलानी तर कार्यकारणी सदस्य म्हणून निलेश नाथानी, पुनीत भल्ला, धर्मेश गादीया, अश्विन मंडोरा, रोमेश जाजू, दिपीका चौधरी, प्रियंका मणियार, मनाली चौधरी, याजविन पेसुना, जिनल जैन आदिंचा समावेश आहे.