जळगाव – शहरातील शेठ लालजी नारायण सार्वजनिक विद्यालयात लाकडी दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना सोमवारी सकाळी समोर आली आहे. काहीही ऐवज हाती न लागल्याने चोरट्यांना रिकामे हाते परतण्याची वेळ आली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान गेल्या दीड वर्षात विद्यालया ही तिसरी घटना असून गस्तीच्या काळात घटनांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ला.ना.शाळेच्या मागील बाजूस विद्या निकेतनच्या बाजूने शिक्षिकांसाठी विश्रांती कक्ष आहे. चोरट्यांनी रविवारी रात्री या कक्षांच्या मागील बाजूचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर येथील लाकडी कपाट फोडले, व त्यातील सामान अस्ताव्यस्त फेकले. काहीही हाती न लागल्याने चोरटे माघारी परतले. 24 रोजी सकाळी शाळेचे सुरक्षारक्षक शाळेत आले. त्यांनी पुढील बाजूने कुलूप बंद असलेला शिक्षिका कक्ष उघडला असता, सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. सुरक्षारक्षकाने घटनेबाबत संस्थेचे पदाधिकारी, शाळाप्रमुखांसह, विभागप्रमुखांना माहिती दिली. माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी सुरक्षारक्षक तसेच विभागप्रमुख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली असल्याची माहिती, शाळा मुख्याध्यापक दुर्गादास उखाजी मोरे यांनी दिली आहे.