पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी अश्लिल पोस्ट ; शिवसेना व छावा संघटनेच्या महिलांचे आंदोलन
जळगाव : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी अश्लिल पोस्ट टाकणार्या निखील संजय ढाके (24, रा.वराडसीम, ता.भुसावळ) व राहूल कारभारी गायकवाड (29, रा.नांदगाव, जि.नाशिक) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या संशयितांचा ताबा मिळावा व दोघा संशयितांनी प्रकाराबाबत माफी मागावी यासाठी शिवसेना व छावा संघटनेच्या महिलांनी जिल्हा रुग्णालय व न्यायालय आवारात सोमवारी सायंकाळी गोंधळ घातला. निखील संजय ढाके (24, रा.वराडसीम, ता.भुसावळ) व राहूल कारभारी गायकवाड (29, रा.नांदगाव, जि.नाशिक) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी सोशल मीडियावर 8 जून रोजी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाली होती. याप्रकरणी विजय अलकाबाई ताठे, मेहेत्रे महेश भगवान, निखील संजय ढाके व राहूल कारभारी गायकवाड या चौघांविरुध्द सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी निखील व राहूल या दोघांना रविवारी अटक केली. या दोघांना सोमवारी न्या.सी.व्ही.पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
महिलांचा जिल्हा रुग्णालयात संताप
न्यायालयाने दोन्ही संशयितांना जामीन नाकारल्याने त्यांना कारागृहात नेण्यासाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर काही महिलांनी संशयितांना आमच्या ताब्यात द्या म्हणून मागणी केली. दोघांनी माफी मागावी म्हणून जोर धरला असता पोलिसांनी या संशयितांना वैद्यकिय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणले. तेथे देखील बराचवेळ गोंधळ चालला. संशयितांची वैद्यकिय तपासणी सुरु असतानाच शिवसेनेच्या शोभा चौधरी, सरिता माळी, वंदना पाटील, मनीषा पाटील, निलू इंगळे, शीतल माळी, कोमल पवार व इतर महिलांनी संशयितांच्या ताब्यासाठी गोंधळ घातला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात नियंत्रण कक्षातून क्युआरटी व महिलांचे पथक पाचारण करण्यात आले होते. यावेळी मोठी गर्दी झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या महिलांची समजूत काढत असतानाच संशयितांना मागील दरवाजातून थेट कारागृहात नेण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच महिलांनी संताप व्यक्त केला. या संशयितांनी महिलांविषयी देखील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याचा आरोप करुन त्यांनी माफी मागावी यासाठी आंदोलन करण्यात आल्याचे महिलांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात आणखी दोघं फरार आहेत.