धुळे | प्रतिनिधी
किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यावसान दोन गटातील हाणामारीत झाले. शहरातील वरखेडी रस्त्यावर झालेल्या या हाणामारीत कोयता, गज, बेसबॉलची बॅट, दगड आणि अन्य शस्रे वापरण्यात आली. एका गटाकडून चारचाकी आणि दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. आझाद नगर पोलीस ठाण्यात दोन्ही गटाच्या 15 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
प्रतीक बडगुजर उर्फ (मल्या) याचा वरखेडी रस्त्यावरच मिरची कांडप व्यवसाय आहे. बुधवारी रात्री साडेअकराच्या दरम्यान प्रतीक यास आकाश परदेशी याचा भ्रमणध्वनी आला. तुला जिवंत सोडणार नाही, असे आकाशने धमकावित शिवीगाळ केली. आकाशने दारूच्या नशेत धमकाविले असेल असे वाटल्याने प्रतिकने या प्रकाराकडे दुर्लक्ष केले. परंतु, थोड्या वेळात प्रतिकच्या घरावर दगडफेक सुरू झाली. यावेळी रात्रीचे साडेबारा वाजले होते. काही विचारण्याच्या आत हल्लेखोरांनी प्रतिकच्या चारचाकीवर आणि दुचाकीवर दगड आणि गजचा वापर करून हल्ला चढविला. प्रतीक घराबाहेर येताच आकाश परदेशी, निखील बडगुजर, दिगंबर माळी यांनी बेसबॉलच्या बॅटने मारहाण केली.
सागरच्या हातात कोयता होता. दर्शन चौधरी, दर्शन माळी, प्रथमेश काळे यांच्या हातात हॉकीस्टीक होती. नंदु परदेशी, शिवम परदेशी यांनी गज आणला होता. यांच्यासह अजून सात ते आठ जण होते. शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देवून हल्लेखोर निघून गेल्याचे प्रतिकने तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, कुंदन शिंदेने दिलेल्या तक्रारीनुसार तो बुधवारी रात्री साडेअकरा वाजेला वरखेडी रस्त्यानेघरी जात असतांना भोले बाबा मंदिराजवळ रिंकू बडगुजर, मल्या बडगुजर, सागर शिंदे, दीपक पाटोळे,भुषण माळी, हर्षल महाचार्य यांनी आकाश परदेशीसोबत का राहतो, असे विचारत शिवीगाळ केली. प्रतीक, कुंदनने वार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.