मुंबई: दिल्लीतील अकाली दलाचे आमदार मंजिंदर एस सिरसा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेल्या भाषणात फेरबदल करण्यात येऊन शेअर करण्यात आला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. याबाबत सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. साकेत गोखले यांनी तक्रार केली आहे.
आमदार सिरसा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन काल रविवारी 13 ऑक्टोबर रोजी राहुल गांधींचा एक फेक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ट्राय कर लिया, देख लिया 70 साल मे कुछ नही हुआ.. देख लिया..’ असे या व्हिडीओत राहुल गांधी म्हणताना दिसत आहेत. मात्र, व्हिडिओत फेरबदल करून बदनामी करण्यात आली असल्याचे आरोप साकेत यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी या व्हिडीओचा गैरवापर करण्यात येत आहे. त्यामुळे, हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही साकेत यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.