गडचिरोली: गडचिरोली येथील नक्षलवादी हल्ल्यात काल 15 पोलीस जवान शहीद झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज गडचिरोलीत जाऊन शहिदांना मानवंदना दिली. तसेच, जवानांचे बलिदान व्यर्थ देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिली.
गडचिरोली येथील पोलीस मैदानावर शहीद जवानांना राज्य पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनीही शहिदांना अभिवादन केले. नक्षलींच्या भ्याड हल्ल्यात 15 जवान शहीद झाले आहेत. यासदर्भात स्वत: डीजी अंतर्गत चौकशी करत आहेत. आपल्या पोलीस दलाने गेल्या 2-3 वर्षात नक्षलवाद्यांवर कारवाई केली. त्यामुळे नक्षलवाद्यांनी बदला घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आम्ही जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार, परिवाराचा आक्रोश वाया जाऊ देणार नाही. आज, आम्ही प्रचंड दुखी आहोत, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नक्षली कारवायांविरुद्ध सरकारची भूमिका स्पष्ट केली. तसेच नक्षल समस्येचा आम्ही आणखी ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने मुकाबला करू, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.