लातूर : लातूर दौर्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी निलंग्याहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. याठिकाणी एका शाळेच्या मैदानात तयार केलेल्या हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण केले. हेलिकॉप्टर जमिनीवरुन काही उंचीवर असतानाच अचानक खाली कोसळले. सुदैवाने हेलिकॉप्टर मातीच्या ढिगार्यावर पडले. उड्डाण केल्यानंतर वार्याचा वेग प्रचंड असल्याने वीजेच्या तारेला हेलिकॉप्टरच्या पंख्याचा काही भाग लागला. अपघातापासून 100 मीटर अंतरावर विजेचा ट्रान्सफॉर्मर होता हेलिकॉप्टर या ट्रान्सफॉर्मरला धडकले असते तर मोठी हानी झाली असती. वेळ आली होती पण काळ आला नव्हता, असाच काहीसा अनुभव आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह त्यांच्या काही सहाकार्यांना आला व ते सर्वजण मोठ्या अपघातातून सुदैवाने बचावले.
पंतप्रधानांकडून विचारपूस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह हेलिकॉप्टरमध्ये त्यांचे सचिव प्रवीण परदेशी, स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार व केतन पाटील हे देखील प्रवास करत होते. दुर्घटनेत केतन पाठक किरकोळ जखमी झाले आहेत. फडणवीस यांनी स्वत:हून ट्विट करुन आपण सुखरुप असल्याची माहिती तातडीने दिली. मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला किरकोळ खरचटले आहे. डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली असून रक्तदाब आणि इतर गोष्टी व्यवस्थित असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे अधिकार्यांनी सांगितले. अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनीही आपण सुखरूप असल्याचे माध्यमांना सांगितले. तसेच पत्नी अमृता फडणवीस आणि आईला फोन करून सुखरूप असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह देश आणि राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून तब्बेतीविषयी विचारपूस केली. सुरक्षारक्षकांनी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांनी तातडीने बाहेर काढले. अपघातांनर मुख्यमंत्र्यांनी कामगार मंञी संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी जाऊन काही काळ विश्रांती घेतली.
हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
भाजपच्या शिवार यात्रेला लातूर जिल्ह्यातील निलंग्यातून गुरुवारपासून सुरूवात झाली. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री लातूरला आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईकडे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर थोड्या उंचीवर जाताच ते जमिनीवर कोसळले. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप कळू शकलेले नाही. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर 22 वर्षे जुने असल्याची माहिती आता समोर येत आहे. यापूर्वीही या हेलिकॉप्टरच्या इंजिनमध्ये बिघाड झाला होता. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड असल्याचे वैमानिक कर्वे यांनी पाच दिवसांपूर्वीच सांगितले होते. तरीही त्यांना उड्डाण घ्यायला लावले, अशीही माहिती समोर येत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील चामोशी तालुक्यातील कोनसरी येथे 12 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. परिणामी त्यांना कारने नागपुरला जावे लागले होते.
मी सुखरुप
मी सध्या निलंग्यातच असून छोटासा अपघात झाला आहे. आम्हाला कोणाला काहीच झालेले नाही. मला तर काहीच इजा झालेली नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. शुगर, ब्लड प्रेशर सगळे व्यवस्थित आहे. ईश्वराची कृपा आणि महाराष्ट्रातील 11 कोटी 20 लाख लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचे कारण नाही. अफवांवर विश्वास ठेऊ नका.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री