मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेला पायलट जबाबदार; अहवाल प्राप्त

0

मुंबई-२५ मे २०१७ रोजी लातूर दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निलंग्याहून मुंबईच्या दिशेने येण्यासाठी निघाले होते. हेलिपॅडची व्यवस्था नसल्यामुळे याठिकाणी असलेल्या एका शाळेच्या मैदानातून हेलिकॉप्टरने आकाशात उड्डाण केले. हेलिकॉप्टर जमिनीवरुन काही उंचीवर असतानाच अचानक खाली कोसळले. लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताला पायलट जबाबदार असल्याचे तपास अहवालाच नमूद करण्यात आले आहे.

विमान दुर्घटना पथकाने आज आपला अंतिम अहवालात सादर केला. अतिरिक्त वजन असूनही उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

या हेलिकॉप्टरमध्ये किती वजन असावे, तापमान किती असाव याचा विचार करण्यात आला नव्हता. पायलटला निलंबित करण्याची शिफारस या अहवालामध्ये करण्यात आली आहे. प्रवासी, सामान, इंधनासह हेलिकॉप्टरने वजनाची मर्यादा ओलांडली होती. वैमानिकांनी मोजलेले वजन ४९४० किलो होते. परंतु न मोजलेल्या ७२ किलो वजनाच्या सामानासह हेलिकॉप्टरचे एकूण वजन सुमारे ५०७२ किलोंवर पोहोचले होते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच यासारख्या नियमांकडे दुर्लक्ष केले जात असेल तर गंभीर बाब आहे असेही नमूद करण्यात आले आहे.

हेलिपॅडजवळचे विद्युत खांब आणि तारांची काळजी पायलटने घेणे अपेक्षित असते. तसेच लातुरच्या उष्ण हवामानात हेलिकॉप्टरने सुरक्षितपणे उड्डाण करण्यासाठी क्षमतेपेक्षा कमी भार घेणे आवश्यक असतानाही त्याची काळजी पायलटनं घेतली नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आलंय.

सुदैवाने हेलिकॉप्टर खाली असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर येऊन आदळले. उड्डाण केल्यानंतर लाईटच्या तारेला हेलिकॉप्टरचा काही भाग लागल्यामुळे हा अपघात झाला. अपघातापासून १०० मीटर अंतरावर विजेचा ट्रान्सफॉर्मर होता. हेलिकॉप्टर या ट्रान्सफॉर्मरला धडकले असते तर मोठा अपघात झाला असता.