बंगळूर-मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी पदभार स्वीकारताच कायदा विभाग आणि पोलीस खात्यात काही महत्वाचे फेरबदल केले आहेत. येडियुरप्पा एकदिवसाचे मुख्यमंत्री ठरतील असे काँग्रेसने म्हटले असले तरी येडियुरप्पा सरकार वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत.
येडियुरप्पांनी मधुसूदन आर नाईक यांच्याजागी प्रभुलिंगा के नवाडगी यांची कर्नाटकच्या अॅडव्हकोट जनरल पदावर नियुक्ती केली आहे. नवाडगी उच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिल आहेत. सरकार स्थापनेसाठी येडियुरप्पांना निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला काँग्रेसने उच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना नवाडगी यांची अॅडव्हकोट जनरल पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
येडियुरप्पांनी पोलिसांच्या गुप्तचर विभागात महत्वपूर्ण बदल केले आहेत. राज्याच्या प्रशासन व्यवस्थेत हा विभाग महत्वपूर्ण समजला जातो. रेल्वेचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमन कुमार पांडे यांना गुप्तचर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनवण्यात आले आहे. भाजपाच्या तीन आमदारांनी आधीचे काँग्रेस सरकार आपले फोन टॅप करत होते असा आरोप केल्यानंतर ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे समर्थन करणारे आमदार रामगनागारा जिल्ह्यातील ज्या रिसॉर्टमध्ये थांबले होते त्या जिल्ह्यात के.अण्णामलाई यांची पोलीस प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.