नगरभूमापन कार्यालयाची जिल्हाधिकार्‍यांकडुन तपासणी

0

अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना घेतले फैलावर

जळगाव – येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरभूमापन कार्यालयात प्रमाणपत्रासाठी दलालांचा सुरू असलेला सुळसूळाटाबाबत वृत्त प्रकाशित होताच जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी कार्यालयाची तपासणी केली. यावेळी कार्यालयातील भोंगळ कारभार लक्षात आल्यानंतर त्यांनी संबधित विभागचे अधिकारी व कर्मचार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले.
नगरभूमापन कार्यालयात सर्वसामान्यांना प्रमाणपत्रासाठी तब्बल दोन हजार रुपये मोजावे लागत आहेत. नगरभूमापन कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराबाबत आमदार सुरेश भोळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. अनेक नागरिकांनीही तक्रार केल्या. यामुळे अचानक जिल्हाधिकार्‍यांनी नगरभूमापन कार्यालयात जाऊन अधिकार्‍यांना नागरिकांच्या तक्रारींचा जाब विचारला. रेकॉर्ड जागेवर ठेवले नसल्याने ते लवकर उपलब्ध होत नाही याला जबाबदार शिपायांना समोर बोलाविले. मात्र शिपायांनी समोर येण्याचे धाडस दाखविले नाही. शेवटी एक महिला समोर आली. पद विचारताच मी शिपाई असल्याचे सांगितले. तब्बल दहा मिनिटांपासून मी शिपाई कोठे आहे असे विचारतो अन तू येथेच असताना सांगत नाही’ याबाबत संताप व्यक्त केला. शिपाई रोजमेरी मेश्रामकर हिची तातडीने एरंडोलला बदली करण्यात आली.
नगरभूमापन कार्यालयातील इतरांनाही कामाबाबत तक्रारी का येतात ? असे विचारून कामात सुधारणा करा अन्यथा कारवाई होईल असा इशारा जिल्हाधिकार्‍यांनी दिला. याच कार्यालयातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी एक जूनला नगरभूमापन कार्यालयाची अचानक झाडाझडती घेऊन शिपायासह कर्मचारी, अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. नगरभूमापन कार्यालयातील रेकॉर्डची तपासणी केली. रेकॉर्ड लवकर सापडत नसल्याने शिपायांनाही धारेवर धरले. नगरभूमापन कार्यालयाशी संबंधित जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय असते. यामुळे जिल्हा अधीक्षक सुनील घोंगडे यांनाही नगरभुमापनच्या कार्यालयाबाबत तक्रारी आहेत. त्याकडे लक्ष का देत नाहीस ?असा जाब विचारला.