जि.प. पोषण आहारातील तक्रारदार रविंद्र शिंदे यांचा आरोप ; वावडे शाळेतील अपहार फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल
जळगाव : शालेय पोषण आहाराची 6 लाख 35 हजार 244 रुपयांची रक्कम परस्पर काढून अपहार केल्याप्रकरणी वावडे, ता.अमळनेर येथील बी.बी.ठाकरे विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप एकनाथ पाटील, अमळगाव येथील आदर्श विद्यालयाचे मुख्याध्यापक यशवंत हिरामण पाटील, तत्कालिन कार्यालय अधीक्षक राज गोपाल नायडू यांच्यासह हेमंत उर्फ किरण अमृतराव साळुंखे, रवींद्र हिंमतराव शिंदे, अॅड.विजय भास्कर पाटील व सोनल संजय पवार (सर्व रा. जळगाव) यांच्याविरुध्द मारवड,ता.अमळनेर पोलीस ठाण्यात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान याप्रकरणात कुठलाही संबंध नाही, पोषण आहारप्रकरणी जिल्हा परिषदेत पाठपुरावा करत आहे, पुरवठादाराने देयके लाटल्याचे समोर आल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला नाही, उलट मी तक्रार केली तर मला वावडेच्या प्रकरणात अडविण्यात आल्याचा आरोप रविंद्र शिंदे यांनी केला आहे.
निलेश रणजीत भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी मविप्र संस्थेचा मानद सचिव आहे. शाळांमधील जुन्या कार्यकारिणी बरखास्त करण्यात आलेल्या आहेत. तसेच संस्थेची आमची कार्यकारिणी वैध असताना व तसे लेखी प्रत्येक शाळेला कळविलेले आहे. 1 फेबु्रवारी 2018 पासून कार्यालय अधीक्षक नायडू यांचे अधिकार संपुष्टात आलेले त्यांनी वावडे व अमळगाव येथील शाळांमध्ये जावून शालेय पोषण आहाराच्या नावाने अमळगाव शाळेतून 3 लाख 7 हजार 706 चा धनादेश घेतला नंतर आदर्श विद्यालयातून 1 लाख 26 हजार 678, 46 हजार 550 व 1 लाख 54 हजार 310 रुपयांचे वेळावेळी धनादेश काढून परस्पर वटविले आहे. निलेश भोईटे यांनी मारवड पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.
भोईटे मानद सचिव नसतांनाही फिर्यादी कसे
निलेश भोईटे मविप्र संस्थेचे मानद सचिव नाही, त्यांनी मानद सचिव असल्याबाबत पुरावा द्यावा. ते मानद सचिव नसतानाही त्यांनी याप्रकरणात फिर्यादी होवून तक्रार कशी दिली. मी मविप्र संस्थेचा संचालक किंवा सभासदही नाही. घरकुल प्रकरणात मी सरकारी साक्षीदार असल्यानेच राजकीय दबावातून माझे नाव या गुन्ह्यात नाव गोवण्यात आल्याचे रवींद्र शिंदे यांनी सांगितले.
राजकीय दबावातून गुन्हा
राजकीय दबावातून गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले आहे. पाच गुन्ह्यांचा पाठपुरावा करीत असल्याने तो थांबावा म्हणून हा गुन्हा दाखल झालेला आहे. यात पक्के बीले, किर्द सर्व कायदेशीर आहे. तपासात पोलिसांना सहकार्य करु, मात्र पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करु नये. -अॅड. विजय भास्कर पाटील