पुणे- केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह ‘बिग बॉस मराठी’च्या टीमविरोधात पुण्यातील हडपसर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविण्यात आली आहे. प्राचीन लवणकार आणि व्यापारी जाती परिसंघाचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष अॅड.कुमार काळेल यांनी ही तक्रार नोंदविली आहे. कलर्स मराठी चॅनलने ‘बिग बॉस मराठी’ हा शो प्रसारित केला जातो.
नियमांचे उल्लंघन
शोमध्ये रेशम टिपणीस व राजेश शृंगारपुरे यांच्यातील अश्लील चाळे, चुंबन आणि अश्लील संवाद तसेच बेडवरील सीन अतिशय लज्जास्पद आणि किळसवाने होते. ‘बिग बॉस मराठी’ हा शो एडिडेट, पूर्व नियोजित चित्रिकरण केलेला आहे. केवळ टीआरपी, प्रसिद्धी तसेच पैसा मिळवण्यासाठी सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या संगनमताने हा सगळा प्रकार सुरु असल्याचे तक्रारकर्ते अॅड. कुमार काळेल यांनी म्हटले आहे. अश्लील हावभाव दर्शवणारे शो रात्री ११ वाजेच्या आधी प्रसारित करणे, कायद्याने गुन्हा असल्याचे अॅड. काळेल यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. स्मृती इराणी यांच्यासह नवनिर्वाचीत माहिती व प्रसारण मंत्री राजवर्धनसिंग राठोड, कलर्स मराठी, व्हियाकॉम 18, ETV नेटवर्क, इंडेमॉल शाईन ग्रुप (इंडिया), निखिल साने, रेशम टिपणीस, राजेश शृंगारपुरे यांच्या विरोधात अॅड. काळेल यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३४ , १२० ब, २९२ , २९३ , २९४ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ आणि ६७ अ अन्वये तक्रार नोंदविली आहे.