येडियुरप्पा यांच्या विरोधात कॉंग्रेसची एसीबीकडे तक्रार

0

बंगळुरू – कर्नाटक काँग्रेसचे वकील सुर्या मुकुंदराज यांनी गुरुवारी येडियुरप्पा यांच्यावर विधानसभेत विश्वासमतासाठी षड्यंत्र केल्याचा आरोप करत त्याबाबत भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे (एसीबी) लेखी तक्रार केली आहे. मुकुंदराज यांनी एसीबीकडे दिलेल्या तक्रारीत येडियुरप्पा यांच्यावर भ्रष्टाचार व षड्यंत्राचा आरोप करत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. येडियुरप्पा यांनी १९ मे रोजी विश्वासमत सिद्ध करू शकणार नाही, हे लक्षात आल्यावर विश्वासमत चाचणी होण्याच्या अगोदरच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

बहुमत नसतानाही राज्यपाल वजुभाई वाला यांनी येडियुरप्पांना सरकार स्थापनेसाठी बोलावल्याने त्यांच्यावर देखील प्रचंड टीका झाली होती. वाला यांनी येडियुरप्पांना विश्वासमत सिद्ध करण्यास १५ दिवसांचा कालवधी दिला. त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसच्या आमदारांना फोडण्यासाठी त्यांना पैशांचे व मंत्रीपदाचेही प्रस्ताव देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. अखेर काँग्रेसने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेल्यानंतर न्यायालयाने विश्वासमत सिद्ध करण्याचा १५ दिवसांचा कालावधी कमी करून दुसऱ्याच दिवशी विश्वासमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते.