नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणुक प्रचारदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने आज बैठक बोलाविली आहे. काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात काय निर्णय झाला त्याची माहिती समोर येईल.
काँग्रेसच्या खासदार सुष्मिता देव यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याविरुद्ध लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवडणूक आयोगाला कारवाईचे निर्देश देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मागणी करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी जवानांच्या आणि शहिदांच्या नावावर मते मागितल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.