भूसंपादनाचे प्रश्न सोडवुन चौपदरीकरणाचे काम पूर्ण करा

0

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांचे आदेश

जळगाव – जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणात ज्याठिकाणी भूसंपादनाचे प्रश्न असतील ते तातडीने मिटवा. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी ठरवून दिलेल्या मुदतीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण करावे अशा सूचना महसूल अधिकारी, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांना आज जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आज महसूल अधिकारी, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, मुख्याधिकारी यांच्या बैठका घेतल्या. यात गेल्या महिन्यातील कामाचा आढावा, महसूल वसुली, महामार्ग चौपदरीकरणाचे स्थिती आदींबाबत माहिती घेतली. काही ठिकाणी महामार्ग चौपदरीकरणाचे काम करताना भूसंपादनाची अडचणी असल्याची माहिती देण्यात आली. जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणासाठी 98 टक्के संपादित झाली असताना अडचणी नको यायला. ज्या अडचणी असतील त्या तातडीने मिटवा व महामार्गाचे चौपदरीकरण काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अप्पर जिल्हाधिकारी डॉ.नंदकुमार बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, सर्व तहसीलदार, प्रांताधिकारी उपस्थित होते.

पुन्हा निवडणूक तयारी

आढावा बैठकीत निवडणूक उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे यांनी अधिकार्‍यांनी मतदार याद्या अद्ययावत करा, 1200 पेक्षा अधिक मतदार असतील तर मुख्य मतदान केंद्राला सहाय्यक कारी मतदान केंद्रे जोडा, मतदान केंद्राची पाहणी करून ती योग्य आहेत किंवा नाही याची चाचपणी करा, अशा सूचना दिल्या. यामुळे राज्यात पुन्हा निवडणुका होण्याबाबत जणू संकेत हुलवळे यांच्या बोलण्यावरून दिसून आले.