नंदुरबार प्रतिनिधी।
राज्यातील साखर हंगामाची सांगता झाली आहे. यावर्षी राज्यातील २१० साखर कारखान्यांनी १० कोटी ५२ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप केले आहे. दरम्यान, यंदा खान्देशातील सहा कारखान्यांनी गाळप केले आहे. त्यांनी २२ लाख टन ऊस गाळप केला आहे.
राज्यातील साखर हंगाम यंदा सरासरी १२१ दिवस चालला. गेल्यावर्षी हाच हंगाम १७३ दिवस सुरू होता. गेल्यावर्षाच्या तुलनेत यावर्षी कमी गाळप झाले आहे. यंदा १०६ सहकारी व १०४ खासगी अशा २१० कारखान्यांनी १० कोटी ५२ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप करुन १० कोटी ५३ लाख १७ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत तीन कोटी किंटल साखरेचे उत्पादन कमी आहे. खान्देशातील सहा कारखान्यांनी यंदा गाळप हंगाम घेतला. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा, आयान व आदिवासी या तीन साखर कारखान्यांनी १४ लाख २८ हजार ६३ टन ऊस गाळप केला आणि १४ लाख ८३ हजार ३०४ क्विंटल साखरेचे उत्पादन केले..
जळगाव जिल्ह्यातील बेलगंगा, चोपडा व संत मुक्ताई साखर कारखान्यांनी आठ लाख एक हजार १८० टन उसाचे गाळप करुन सात लाख ८९ हजार ३३७ किंटल साखरेचे उत्पादन केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सरासरी उतारा १०.३९ तर जळगाव जिल्ह्याचा सरासरी उतारा ९.८५ आहे.
आयान शुगरचा १३ वा क्रमांक
राज्यातील २१० पैकी १० लाखापेक्षा अधिक टन उसाचे गाळप करणारे १९ कारखाने आहे. त्यात नंदुरबार जिल्ह्यातील आयान शुगरचा १३ वा क्रमांक आहे. या कारखान्याने १० लाख ६१ हजार २७२ टन उसाचे गाळप करुन १०.५० च्या सरासरी उताऱ्याने ११ लाख १४ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.