केंद्रावरील कर्मचार्यांकडून मूळ आधारकार्डची मागणी ; विनंती करुनही तरुणीसह अनेकांना पाठविले परत ; पोलिसांना बोलावून पोलीस ठाण्यात नेण्याची दिली धमकी
जळगाव – गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध जिल्ह्यातील तलाठीच्या रिक्त पदांसाठी परिक्षा सुरु आहे. जळगाव शहरातील काही केंद्रावर या पदासाठी परिक्षा सुरु आहेत. यादरम्यान केसीई महाविद्यालयाच्या केंद्रावर पत्ता, छायाचित्र, नाव असे सुस्पष्ट असलेले आधारकार्ड असून तरुणीला परिक्षेला मुकावे लागल्याची घटना मंगळवारी घडली. पाऊणतास विनंती करुनही केंद्रावरील कर्मचार्यांनी तरुणीचे एैकून न घेता उलट गोंधळ घातला तर पोलिसात जमा करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार यावेळी घडला. परिक्षेला मुकल्याच्या प्रकारानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दिली असून संबंधितांवर कारवाईक करण्याची मागणी केली आहे.
जळगाव तालुक्यातील करंज येथील माहेर तसेच नंदुरबार येथील सासर असलेल्या अंकिता मंगल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तलाठीच्या रिक्त जागांसाठी अर्ज केला आहे. या अर्जासाठी परिक्षा केंद्र म्हणून अंकिता हिने माहेर असल्याने जळगाव शहराची निवड केली. अर्ज केल्यानुसार. अंकिता हिची मंगळवारी जळगाव येथील केसीई महाविद्यालयाच्या केंद्रावर परिक्षा होती. त्यासाठी अंकिता ही नंदुरबारहून जळगावला आली होती.
पाऊणतास विनंतीनंतर कर्मचार्यांकडून थेट धमकी
दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत परिक्षा होती. वेळेपूर्वीच अंकिता परिक्षा केंद्रावर हजर झाली. याठिकाणी प्रवेश करीत असताना तिला प्रवेश केंद्रावर नियुक्त कंत्राटी कर्मचार्यांकडून आधारकार्डची विचारणा झाली. अंकिताने तिच्याकडील आधारकार्ड दाखविले. या कार्डवर तिचा फोटो, नाव तसेच पत्ता सुस्पष्ट होता. यानंतर कर्मचार्यांनी तिला मूळ आधारकार्डची मागणी केली. अंकिताने या आधारकार्डचा काय अडचण हे विचारले असता कर्मचारी मूळ आधारकार्डच लागेल त्याशिवाय प्रवेश मिळणार नाही असे सांगत होते. अंकिता त्यांना विनंती करुन आधारकार्डवरील नावाची ऑनलाईन चौकशी करा, खात्री करा, चुकीचे नसल्यास माझ्यावर कारवाई करा, असेही सांगितले. तब्बल पाऊणतास अंकिता विनंती करत होती. मात्र कर्मचार्यांनी एैकून न घेता, गोंधळ घालू नकोस अन्यथा पोलिसांत जमा करु अशी धमकीच दिली.
सुवर्णपदक प्राप्त तरुणीला अश्रू अनावर
अंकिताला हिला विज्ञान शाखेत आरगॅनिक केमिस्ट्री या विषयात पदवीला सुवर्णपदक मिळाले आहे. विनंती करुनही परिक्षा संपेपर्यंत प्रवेश न मिळाल्याने तसेच तलाठी पदासाठीची संधी उकल्याने अंकिताला अश्रू अनावर झाले होते. यादरम्यान काही तरुणांनाही याच कारणावरुन प्रवेश नाकारल्याचीही माहिती अंकिता हिने बोलतांना दिली. हा प्रकार तिने तिचे वडील छावाचे ज्ञानेश्वर पाटील यांना कळविला. ज्ञानेश्वर पाटील यांनी मुलगी अंकितासह सामाजिक कार्येकर्ते रवी देशमुख तसेच कार्यकर्त्यांसह जिल्हापेठ पोलीस ठाणे गाठले.
जिल्हाधिकार्यांना देणार निवेदन
रवी देशमुख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप आराक यांना प्रकार कथन केला. तसेच संबंधित केंद्रावरील कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानुसार आराक यांनी तत्काळ सूत्र हलवित केंद्रावरील नायब तहसीलदार आर.एन.अहिरे, सुमित काटकर, राहूल जाधव, बी.एस. परदेशी या कर्मचार्यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बोलाविले. दरम्यान याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. अंकिता सह परिक्षेला मुकलेल्या तरुणांना न्याय मिळावा म्हणून बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार असल्याचेही रवी देशमुख यांनी बोलतांना सांगितले.