विश्वासात न घेता निधीचे परस्पर वाटप केल्यावरून जि.प. अध्यक्षांवर आरोप
जळगाव: जिल्हा परिषदेला डीपीडीसीकडून दुसर्या टप्प्यात आलेला 10 कोटीचा निधी अध्यक्षांसह पदाधिकारी व काही निवडक सदस्यांनी वाटप करून घेत आपआपल्या गटात कामे टाकून घेतली. अनेक सदस्यांना अंधारात ठेवुन निधीची परस्पर विल्हेवाट लावल्याने जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी भाजपाच्याच सदस्यांनी प्रचंड गोंधळ घातला. यावेळी भाजपाच्या सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसह अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे जिल्हा परिषदेची स्थायी सभा गुंडाळण्याची नामुष्की सभापतींवर आली.
जिल्हा परिषदेला दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळाकडून कोट्यावधीचा निधी येत असतो. यावर्षी पहिल्या टप्यात 70 टक्के निधी आल्यानंतर त्या निधीतुन कामे प्रस्तावित करण्यात आली असुन अनेक कामांना सुरूवात देखील झाली आहे. मात्र आचारसंहितेपुर्वीच डिपीडीसीकडून उर्वरीत 30 टक्के मधील 10 कोटीचा निधी आल्यानंतर अध्यक्षांसह काही पदाधिकार्यांनी हा निधी परस्पर वाटप करून घेतल्याची बाब निदर्शनास आली आहे.
भाजपाच्या लालचंद पाटलांचा हल्लाबोल
स्थायी समितीची सभा सुरू असतांंना दुपारी 2 वाजता भाजपाचे सदस्य लालचंद पाटील,रविंद्र पाटील,गजेंद्र सोनवणे तसेच राष्ट्रवादीचे रविंद्र पाटील,जयश्री पाटील,डॉ.निलम पाटील यासह महिला सदस्य तसेच शिवसेनेचे गोपाळ चौधरी आदींनी सभागृहात प्रवेश करून निधी बाबत उपाध्यक्षांसह पदाधिकार्यांना विचारना केली.आम्हाला निधी का दिला नाही,आम्ही सदस्य नाही का? आलेल्या निधीतुन परस्पर कामे ठरवून घेतली आम्हाला का विश्वासात घेतले नाही? असा जाब त्यांनी विचारला. तसेच अधिकार्यांना देखील धारेवर धरले.
पदाधिकार्यांनी हात केले वर
आचार संहिता लागण्यापुर्वी सर्वसाधारण सभेत कामे लवकर व्हावी,आचारसंहितेपुर्वीच कामांना प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी कामांच्या मंजुरीचे अधिकार अध्यक्षांना देण्याचा ठराव करण्यात आला होता.त्यामुळे अध्यक्षांनी जी कामे मंजुर केली आहे तीच या निधीत आली आहे,कामे आम्ही मंजुर केली नाही असा सुर उपाध्यक्षांसह पदाधिकार्यांनी हात वर करून अध्यक्षांवरच खापर फोडले.
निधीचा मुद्दा थेट पक्ष कार्यालयात
निधीच्या समान वाटपाचा मुद्दा थेट भाजपाच्या जिल्हा कार्यालयापर्यंत गेला. जि.प सदस्य लालचंद पाटील यांच्यासह रविंद्र पाटील व अन्य काही भाजपाचे सदस्यांनी पक्ष कार्यालयात जावून स्वकियांबाबत नाराजीची री ओढली. यावेळी संजीव पाटील यांनी अध्यक्षा उज्वला पाटील यांच्याशी संपर्क केला.त्यानंतर पक्षाचे नेते गिरीष महाजन यांच्याशी देखील संपर्क केला असल्याचे सांगण्यात आले. 10 कोटीची कामे थांबविण्याच्या सुचना देखील करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.
निधी वाटपाचा घोळ सुरूच
भाजपाकडून निधी वाटपात स्वपक्षाच्या सदस्यांनाच विश्वासात घेतले जात नसल्याची बाब गेल्या दोन वर्षात पहावयास आली आहे. यावर्षी देखील तोच पायंडा पडल्याने एका गटात ही सल कायम बोचत असल्याचे निदर्शनास आले आहे.गेल्या वर्षीतर सत्ताधार्यातच फुट पडून शिवसेनेच्या मदतीने थेट समान निधी वाटप करण्यास सत्ताधार्यांना भाग पाडले होते हे विशेष.