काँग्रेस-जेडीएस विरोधात हिंदू महासभा कोर्टात

0

बंगळूर-मोठ्या राजकीय नाट्यानंतर अखेर कर्नाटकात नवे सरकार स्थापन होत आहे. भाजपा बहुमत सिद्ध करु न शकल्याने काँग्रेस-जेडीएसने येथे सत्ता स्थापनेचा केलेला दावा राज्यपालांनी मान्य केला असून या युतीला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले आहे. त्यानुसार, बुधवारी जेडीएसचे नेते कुमारस्वामी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, काँग्रेस-जेडीएसच्या या सरकारविरोधात आता अखिल भारतीय हिंदू महासभेने शड्डू ठोकला असून थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यामुळे अजूनही कर्नाटकातील सत्तेबाबत खळबळ सुरुच असल्याचे चित्र आहे.

बुधवारी घेणार शपथ

भाजपा नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी शनिवारी आवश्यक संख्याबळाअभावी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने आता काँग्रेस-जेडीएसच्या सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेचे निमंत्रणही दिले आहे. त्यामुळे सोमवारीच कुमारस्वामी आपल्या आमदारांसह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार होते. मात्र, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिधीमुळे हा शपथविधीचा कार्यक्रम पुढे ढकलून बुधवारी ठेवण्यात आला आहे.

त्यामुळे आता कुमारस्वामी बुधवारी शपथ घेणार असून त्यासाठी त्यांनी सर्व मित्रपक्षांना शपथविधीला येण्यासाठी निमंत्रणे दिली आहेत. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी, बसपाच्या सुप्रीमो मायावती यांना शपथविधीसाठी निमंत्रण दिले आहे.