नवी दिल्ली-दिल्लीतील काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी आज दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे.
अजय माकन यांनी गेल्या महिन्यातच पक्षनेतृत्वाला राजीनाम्याची कल्पना दिली होती. आज त्यांनी दिल्लीतील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षनेतृत्वाकडे सोपवल्याचे स्पष्ट झाले. अजय माकन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा दिला असून ते उपचारासाठी परदेशात रवाना झाले आहेत.
५४ वर्षीय अजय माकन यांनी तीन वर्षांपूर्वी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षपादाचा कार्यभार स्वीकारला होता. अरविंदर सिंग लवली यांनी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने अजय माकन यांच्याकडे दिल्लीची धूरा सोपवली होती. विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यावेळीही अजय माकन यांनी राजीनामा दिला होता. मात्र, पक्षनेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्वीकारला नव्हता. लोकसभा निवडणूकजवळ असतानाच माकन यांनी राजीनाम दिल्याने दिल्ली काँग्रेसला मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.