पक्षविरोधी भूमिकेमुळे जिल्हाध्यक्षांकडून कारवाई
जळगाव – विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी भूमिका घेत पक्षाच्या अधिकृत उमेदवारविरूध्द प्रचार केल्याप्रकरणी दोन पदाधिकार्यांवर जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली.
विधानसभा निवडणुकीत भाजपा, शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केली. या बंडखोरीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ना. गिरीश महाजन यांनी कठोर भूमिका घेत कारवाईचा इशारा दिला होता. मात्र भाजपा आणि शिवसेनेकडुन कुठल्याही पदाधिकार्यावर कारवाई करण्याची हिंम्मत देखिल झाली नाही. याऊलट मात्र काँग्रेस पक्षाने बंडखोरीची गंभीर दखल घेतल्याचे दिसून येत आहे. रावेर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिरीष चौधरी यांच्या निवडणूक प्रचारात पक्षविरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष पंकज वसंत वाघ व काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे सचिव गयासुद्दीन सबरूद्दीन काझी या दोन्ही पदाधिकार्यांवर जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. पक्षशिस्त मोडली म्हणून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील यांनी ‘दै. जनशक्ति’शी बोलतांना दिली. दरम्यान काँग्रेसने बंडखोरांवर कारवाई केली असुन भाजपा आणि शिवसेना पक्षविरोधी भूमिका घेतलेल्या आपल्या पदाधिकार्यांवर कारवाईची हिंम्मत दाखविणार का? असा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे.