काँग्रेसचे संकटमोचक डी.के.शिवकुमार यांची ईडीकडून चौकशी सुरु

0

नवी दिल्ली: कॉंग्रेसचे नेते सध्या ईडीच्या रडारवर आहेत. माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या पाठोपाठ आता कर्नाटकातील काँग्रेसचे संकटमोचक अशी ओळख असलेले डी.के.शिवकुमार यांची ईडीकडून चौकशी होत आहे. आज सोमवारी त्यांची ईडी चौकशी होत आहे. त्यासाठी ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले आहे. सकाळपासून त्यांची चौकशी सुरु झाली आहे. आठवड्याभरापूर्वी त्यांना ईडीची नोटीस मिळाली होती.

आयकर विभागाने शिवकुमार यांच्या दिल्लीतील काही ठिकाणांवर छापे टाकले होते. त्यामध्ये आठ कोटींपेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात ईडीने डी.के.शिवकुमार आणि त्यांच्या तीन सहकाऱ्याविरोधात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता.

दरम्यान भाजपसरकार कडून हेतुपुरस्सर विरोधकांना बदनाम करण्यासाठी ईडी सारख्या संस्थेचा वापर होत असल्याचा आरोप होत आहे. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी देखील भाजपकडून राजकीय सूडबुद्धीने शिवकुमार यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप केला आहे.