प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्काराची धमकी देणाऱ्यास अटक

0

मुंबई-काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करण्याची धमकी देणाऱ्या तरुणास मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अहमदाबादमधून त्याला अटक करण्यात आली आहे. काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांना काही दिवसांपूर्वी ट्विटर हँडलवरुन धमकी देण्यात आली होती. मंदसौर बलात्कार प्रकरणी व्हायरल होत असलेल्या एका खोट्या मेसेजप्रकरणी चतुर्वेदी यांना धमकावण्यात आले होते.

प्रियंका चतुर्वेदी यांच्या मुलीवर बलात्कार करु, अशी धमकी देण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयानेही या प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलिसांना संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा मुंबई पोलिसांनी तपास सुरु केला होता. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी अहमदाबादमधून एकाला अटक केली आहे. गिरीश महेश्वरी असे त्याचे नाव असल्याचे समजते. पोलिसांनी घटनेची दखल घेत संबंधितास अटक केल्यानंतर चतुर्वेदी यांनी पोलिसांचे आभार मानले.