मविआच्या सभेनंतर कॉंग्रेस नेते राहुल, प्रियंका गांधी यांची नागपूरमध्ये सभा

नागपूर | केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीची संयुक्त सभा १६ एप्रिलला नागपुरात होत आहे. त्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान  काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वडरा यांची जाहीर सभाही याच महिन्याच्या शेवटी  नागपुरात आयोजित करण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

राहुल आणि प्रियंका यांची एकत्र सभा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात यापूर्वी झालेली नाही. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस अधिक आक्रमक झाले आहे. कर्नाटकमध्ये निवडणुका आहेत. तेथे १३ एप्रिलला राहुल गांधी सभा घेत आहेत. तर नागपुरात येत्या २० ते २५ एप्रिलदरम्यान सभेची नियोजन करण्यात येत आहे. भाजपचे केंद्रातील सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार यंत्रणांचा वापर करून विरोधकांना संपवण्याचा घाट रचत आहे. देशभरात दडपशाही सुरू आहे. याविरोधात राहुल आणि प्रियंका देशभर सभा घेण्यात येतील. त्याची सुरुवात नागपुरात केली जाणार आहे. यासंदर्भात १० एप्रिलला प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेण्यात येणार आहे. त्यात नागपूरच्या सभेचे नियोजन करण्यात येणार आहे.