पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधीवरही घेतले तोंडसुख
कर्नाटक निवडणूक
तुमाकुर/गदग : काँग्रेस पक्ष भारतातील गरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आता त्यांनी गरीब बोलणे बंद केले आहे कारण आता लोकांनीच गरीब कुटुंबातून पंतप्रधान निवडला आहे. इंदिरा गांधी यांच्या काळापासून निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसने गरिबांना मूर्ख बनवले आहे. काँग्रेस हा खोट बोलणारा पक्ष असून मतांसाठी ते पुन्हा खोटे बोलत आहे. त्यांनी शेतकर्यांची किंवा गरिबांची कोणाचीही काळजी नाही. लोक आता काँग्रेसला वैतागले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. तुमाकुर येथे जाहीर सभेत मोदी बोलत होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच तापला असून, मोदींनी आता नेहरूंनंतर इंदिरा गांधींवरही तोंडसुख घेतले आहे.
पाच मिनिटे बोला : राहुल गांधी
पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना कागद न घेता 15 मिनिटे भाषण करण्याची आणि पाच वेळा विश्वेश्वरय्या बोलण्याचे आव्हान दिले हाते. यावर आता काँग्रेस अध्यक्षांनीही पलटवार केला आहे. राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ ट्वीट केला असून ज्यात काही मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींना पाच मिनिटे बोलण्याचे आव्हान दिले आहे. प्रिय मोदीजी तुम्ही जास्त बोलता, पण तुमची कामे आणि शब्दांचा ताळमेळ नसतो. रेड्डीबंधू टोळीला 8 तिकीटे देण्याबाबत पाच मिनिटे बोलणार का? याचप्रकारे येडियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनवल्याप्रकरणीही प्रश्न उपस्थित केले आहेत. 23 खटले असूनही येदियुरप्पांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बनविल्याबाबत पंतप्रधान बोलणार का? आदी आरोप राहुल गांधी यांनी केले आहे.