कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा ‘शपथनामा’ जाहीर; शेतकरी, महिला, तरुण, प्रदूषणमुक्त शहराला प्राधान्य

0

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने आपल्या विधानसभा निवडणूक २०१९ साठी जाहीरनामा ‘शपथनामा’ आज मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. यात शेतकरी, महिला, तरुण यांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून पर्यावरणाचा देखील समावेश आहे. शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी, सेंद्रिय शेती व आधुनिक तंत्रज्ञानाला चालना देऊन ग्रामीण विकासावर भर देण्याबरोबरच आनंदी शहरे, सुरक्षित आणि प्रदूषणमुक्त शहरांना प्राधान्य, छेडछाडमुक्त महाराष्ट्र, पाच दिवसांचा आठवडा, राईट टू डिस्कनेक्ट अ‍ॅक्ट कायदा करण्याचे आश्वासन शपथनाम्यातून देण्यात आले आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जाहीरनामा समितीने हा शपथनामा तयार केला आहे. यामध्ये ग्रामीण, शहरी भागाच्या विकासासोबतच तरुण पिढीचा विचार करण्यात आला आहे. याशिवाय आघाडीची सत्ता असताना १५ वर्षांत कशी प्रगती केली आणि गेल्या पाच वर्षांत राज्याची कशी अधोगती झाली हे देखील आघाडीच्या शपथनाम्यात ठळकपणे मांडण्यात आले आहे.

यात जलनीती तयार करणारे पहिले राज्य, गुटखा, पानमसाला बंदी घालणारे पहिले राज्य, ऑनलाईन दस्त नोंदणी करणारे पहिले राज्य, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शंभर टक्के रासायनिक तपासणी करणारे पहिले राज्य अशा प्रमुख सुमारे १५ ते २० योजना आघाडी सरकारच्या काळात करण्यात आल्याचे शपथनाम्यात स्पष्ट केले आहे.
तर गेल्या पाच वर्षांत राज्यात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीची भीषण स्थिती, राज्याच्या अर्थव्यवस्थेची झालेली घसरण आदी सर्व अधोगतीची आकडेवारीसह माहिती देण्यात आली आहे.