मुंबई : परवा लागलेल्या लोकसभा निकालात भाजप प्रणीत एनडीएने पुन्हा एकदा २०१४ च्या निवडणुकीपेक्षा अधिक जागा मिळवत एकहाती सत्ता मिळवली. राज्यात कॉंग्रेसला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला ६जागांवर विजय प्राप्त करता आला. यावर महाराष्ट्र राज्य कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांसोबत बोलताना असे सांगितले की, राज्यात बहुजन वंचित आघाडीमुळे कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठा फटका बसला आहे. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे.
राज्यात अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघडीच्या उमेदवाराने दीड ते दोन लाख मत खाल्ली त्यामुळे शिवसेना आणि भाजपाला त्याचा मोठा फायदा झाला आहे. सेना, भाजपाच्या फायद्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार उभे केले अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. राज्यातील कॉंग्रेस पक्षाच्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. प्रकाश आंबेडकर यांच्या हट्टामुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादी पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे असेही ते या वेळी म्हणाले.
लोकसभेच्या निकालानंतर राज्यातील सर्व कॉंग्रेसच्या उउमेदवारांशी चर्चा करणार असून, येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पुन्हा एकदा आघाडीतल्या घटक पक्षांसोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी या वेळी सांगितले. राज्यात कॉंग्रेसच्या पराभवा नंतर प्रदेशाध्यक्षपदी आक्रमक नेत्याची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नारायण राणे यांच्या प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी या बाबतीत काही माहिती नसल्याचे सांगितले.