मुंबई – विधानपरिषदेच्या ६ जागांसाठी सेना-भाजपमध्ये प्रत्येक ३-३ जागा घेऊन मार्ग निघाल्यानंतर अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील समेट झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत ज्या लातूरच्या जागेवरून वाद सुरू होता, ती जागा काँग्रेसने राष्ट्रवादीला देऊ केली आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही समेट झाला असल्याचे वृत्त आहे.
काँग्रेसकडे असलेली लातूरची जागा राष्ट्रवादीला तर राष्ट्रवादीकडे असलेली परभणीची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला आहे. याबाबत अद्याप दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाहीर घोषणा झालेली नाही. नव्या समीकरणांनुसार कोकण, नाशिक आणि लातूर या ३ जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. तर अमरावती, चंद्रपूर आणि परभणी या जागांवर काँग्रेस उमेदवार देणार आहे. दरम्यान, शिवसेना आणि भाजपमध्ये देखील युती झाली असून ३ जागा शिवसेना तर ३ जागांवर भाजप लढणार आहे.