काँग्रेस राष्ट्रवादीची अर्धवट स्मारके पूर्ण करणार!

0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा चार वर्षपूर्ती कार्यक्रमात हल्लाबोल

मुंबई :- गेल्या 48 वर्षात राज्यातील सिंचनाची परिस्थिती 18 टक्क्यांवर गेली नाही, मात्र मोदी आणि देवेंद्र सरकारने 40 टक्क्यांवर सिंचन नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच कॉंग्रेस राष्ट्रवादीने टेंभूपासून ते गोसीखुर्द पर्यंत अनेक योजना अपूर्ण अवस्थेत ठेवल्या आहेत, ही कॉंग्रेसची अर्धवट स्मारके असून ती आपण पूर्ण करणार असल्याचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने ते मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंचनासाठी सरकारने 5 हजार कोटी रूपयांची तरतूद केल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितलॆ.

यावेळी त्यांनी मोदी सरकारने गेल्या चार वर्षात केलेल्या कामांची जंत्री वाचून दाखवली. वाहतूक विभागामार्फत कोणकोणत्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. याची माहिती त्यांनी दिली. लक्षावधी कोटी रूपयांची कामे देशभरात सुरू असून लवकरच ही कामे पूर्ण होतील त्यामुळे वाहतूकीत सुलभता निर्माण होऊन वाहतूकीचा खर्च कमी होऊन परिणामी महागाई कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंबई ते दिल्ली असा एक्सप्रेस हायवे तयार करण्यात येणार असून हा रस्ता आदिवासी पट्ट्यातून जाणार आहे. त्यामुळे आदिवासींचा विकास होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विमानतळावर पोहोचण्यासाठी जलमार्ग उभारणार
नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळासाठी मुंबई आणि परिसरातील लोकांना जलवाहतूकीने जाता यावे, यासाठी जलमार्ग करण्याचा आपल्या विचार आहे. गिरगाव, कुलाबा,सांताक्रुझ, वसई- विरार, या भागांतून प्रवाशांना जलवाहतूकीच्या माध्यमातून या विमानतळावर पोहोचता यावे, यासाठी सरकार काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरात खासदार प्रकल्प म्हणून आपण गृहप्रकल्प उभारत असून या प्रकल्पातील घर भिका-यालाही खरेदी करता यावे,असा आपला मानस आहे. त्यासाठी 460 चौ. फुटाचे हे घर केवळ साडेतीन लाख रूपयांत उपलब्ध करून देत असून सोफासेट, वीज, एलईडी,डबलबेड,गरमपाणी या गोष्टी मोफत देणार असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेशी मी चर्चा करणार नाही!
शिवसेनेशी झालेली युती ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली आहे. त्यामुळे युतीत विघ्न येण्याचा प्रश्न नाही, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि भाजपा यांचे नाते तुझे माझे जमेना आणि तुझ्यावाचून करमेना, असे असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र युतीबाबत उद्धव ठाकरेंशी आपण चर्चा करणार नाही, असे त्यांनी सांगितले.तर महाराष्ट्रात परतण्याचा आपला कोणताही विचार नसून आपण केंद्रात समाधानी आहोत. देवेंद्र चांगले काम करत असून त्याना रस्ते आणि सिंचनाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.