मुंबई: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सपाटून मार खावा लागला आहे. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीला ४८ जागा पैकी फक्त ६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक होत आहे.
या बैठकीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह स्वाभिमानी संघटना, शेकाप, रिपाई ( कवाडे गट ) यांच्या पक्षातील नेते उपस्थित राहणार आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा आढावा घेण्यासाठी आजची बैठक आहे. राज्यात भाजपा विरोधात वातावरण असताना याचा फायदा का घेता आला नाही. तसेच वंचित बहुजन आघाडीचा मोठा फटका कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला आहे. यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
काही महिन्यावर येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीविषयी पण या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यात लागलेल्या लोकसभा निकालात कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निकालात ४८ जागांपैकी कॉंग्रेसला १ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला केवळ ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.