नवी दिल्ली- बॉलीवूडमध्ये सध्या #Me Too या मोहीमेने धुमाकूळ घातला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर राजकारणात देखील आता याचे लोण पसरू लागले आहे. दरम्यान लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेला काँग्रेसच्या एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष फिरोज खान याने स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी स्वीकारला आहे.
फिरोज खान याच्यावर एका पत्राच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. एका महिलेने राहुल गांधींना पत्र लिहिले आहे. या पत्रात फिरोज खान, काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे प्रमुख चिराग पटनायक यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.
पत्रावर काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमच्या महिला दिव्या स्पंदना यांना चिरागच्या कृत्याबाबत त्या महिलेने सांगितले होते. परंतु चिरागवर कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच फिरोज खान यांच्यावर छत्तीसगडमधील महिला काँग्रेस कार्यकर्तीनं लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. फिरोज खानवर जूनमध्ये हे आरोप झाले होते, त्यानंतर जवळपास 4 महिन्यांनंतर त्यांना पद सोडावं लागलं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनीही या #Me Too मोहिमेचे समर्थन केले आहे. आता वेळ आली आहे की, सगळ्यांनीच महिलांचा सन्मान केला पाहिजे. सत्य सर्वांसमोर आल्यास नक्कीच बदल होईल, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.