नवी दिल्ली- काँग्रेसच्या बॅनरवर अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासहित इतर नेत्यांच्या फोटोसोबत त्यांच्या जातीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसवर टीका होत आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये अनेक ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत. भाजपाने बॅनरवर आक्षेप घेत राहुल गांधींवर टीका केली आहे. राहुल गांधी बिहारमध्ये जातीचे राजकारण करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
बॅनरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि बिहारमधील अखिल भारतीय काँग्रेस कमिटी इन-चार्ज शक्तिसिंह गोहिल यांचे आभार मानण्यात आले आहेत. नव्या काँग्रेस समितीची नियुक्ती केल्याने त्यांचे आभार मानत, सामाजिक सौदार्हाचं उदाहरण ठेवल्याबद्दल हे आभार मानण्यात आले आहेत.
बॅनरवर राहुल गांधींसहित इतर नेत्यांच्या जातीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. राहुल गांधी आणि बिहार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांना ब्राम्हण समाजाचे प्रतिनिधित्व करत असल्याचे दाखवण्यात आले असून, शक्तिसिह गोहिल राजपूत समाजाचं नेतृत्व करत असल्याचे दाखवण्यात आले आहे.