मुंबई: राज्यात सत्तास्थापन करण्याचा तिढा अद्याप सुटला नसून सेना, भाजपा मधील वाद कमी होण्याची चिन्हे दिसत नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून आघाडी म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेचं निमंत्रण द्यावं, अशी मागणी काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी केली आहे. दुसरीकडे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं आहे. त्यावर भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तास्थापनेचे आमंत्रण दिले आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापन करण्याची आपल्या पक्षाची इच्छा आणि क्षमता आहे का?, अशी विचारणा राज्यपाल कोश्यारी यांनी फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. त्यावर सत्ता स्थापन करायची की नाही, याचा निर्णय भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला जाईल, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे.
काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्विट करून सत्तास्थापन करण्यात ट्वीस्ट आणला आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी दुसरी मोठी आघाडी म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित करावं,’ असे म्हटले आहे. मात्र, विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी कुणाच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध करेल, हे स्पष्ट केलं नाही. शिवसेनेच्या पाठिंब्याची शक्यताही त्यांनी स्पष्ट केलेली नाही. दुसरीकडे सध्याचे आकड्यांचे गणित पाहता शिवसेनेच्या पाठिंब्याशिवाय महाआघाडी सत्तेत येणे अशक्य आहे, असे दिसते.