मुंबई: राज्यात सत्तास्थापन झाली नसून, कॉंग्रेस पक्षाचे राज्यातील नवनिर्वाचित आमदारांनी दिल्ली येथे सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केली होती. कॉंग्रेस पक्षाचे नेते हुसेन दलवाई यांनी कॉंग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून, राज्यात सत्ता स्थापनेसाठी कॉंग्रेसने शिवसेनेला मदत करावी असे विनंती करणारे पत्र लिहिले आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणारा शिवसेना पक्ष आता सर्वसमावेशक झाला असल्याचे नमूद केले आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीदरम्यान शिवसेनेने प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता याचीही आठवण दलवाई यांनी सोनिया गांधी यांना केली आहे.
काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर हे सरकार ५ वर्षे टिकेल असे प्रयत्न व्हायला पाहिजेत असेही दलवाई यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. एका खासगी भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून रोखण्यासाठी शिवसेनेला पाठिंबा देणे आवश्यक असल्याचेही हुसेन दलवाई यांनी अधोरेखित केले आहे. दरम्यान, काँग्रेसपक्षात शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून दोन गट पडले असल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेना हा हिंदुत्वाचे राजकारण करणारा पक्ष असून काँग्रेस पक्षाने राज्याच्या राजकारणात शिवसेनेला कायम विरोध दर्शवला आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्यास विरोध दर्शवला होता.
तसेच, काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली होती. शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रश्नच येत नाही. जनतेनं काँग्रेसला जो कौल दिला आहे, त्यानुसार काँग्रेस पक्ष विरोधी बाकावरच बसणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबत सोनिया गांधी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.