पुणे :- काँग्रेसतर्फे 27 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता केंद्रातील मोदी सरकारच्या चार वर्षाच्या काळ्याकुट्ट कारकिर्दीविरोधात मूक मोर्चा काढून निषेध करण्यात येणार आहे. याबाबत शहर काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे. हा मोर्चा मंडईतील टिळक पुतळा ते स्वारगेट चौकातील जेधे पुतळ्यापर्यंत असणार आहे.
मोदी सरकारकडून जनतेची फसवणूक
मोदी सरकारने गेल्या चार वर्षात जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी, कामगार, दलित, अल्पसंख्यांक वर्गाची मोठया प्रमाणात गळचेपी होत आहे. शेतकऱ्यांची तर या सरकारने दुप्पट हमीभाव, कर्जमाफी यावरून फसवणूक केली आहे. हे सरकारने फक्त जाहिरातबाजी केली आहे” त्यात काँग्रेस कमी पडल्याचे बागवे यांनी मान्य केले. तसेच देशात प्रथमच शेती अवजारावर टॅक्स लावून शेतकऱ्यांची गळचेपी करण्याचा प्रकार सुरू आहे. त्याउलट उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात आहे. काळा पैसा भारतात परत आणण्याचे आश्वासन देऊन 4 वर्षे झाली, मात्र काहीच झाले नसून उलट निरव मोदी, माल्या यासारख्यानी राष्ट्रीयकृत बँकांना बुडवून पळून गेले. तीच परिस्थिती राष्ट्रीय सुरक्षेची झाली आहे. अतिरेकी हल्ल्यात वाढ झाली असून अंतर्गत सुरक्षाही धोक्यात घालण्याचे काम या सरकाने केले आहे. त्यांच्या सर्व योजना या फेल गेल्याचा आरोपही बागवे यांनी केला.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, अभय छाजेड, लता राजगुरू, संगीत तिवारी, नगरसेवक रवींद्र धांगेकर, अविनाश बागवे उपस्थित होते.