भंडारा : भंडारा गोंदियातील प्रफुल्ल पटेल आणि माझ्यातील वाद संपलेला आहे. भंडारा-गोंदिया भाजपमुक्त करण्यावर एकमत झाले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येऊन ही निवडणूक लढेल. वरिष्ठ येत्या दोन दिवसात निर्णय घेतील. जो निर्णय देतील तो दोघांनाही मान्य असेल. अशी भूमिका नाना पटोले यांनी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणी बैठकीत शरद पवार यांनी पोटनिवडणुकीच्या दोन जागांपैकी एक-एक जागा लढण्यासाठी मित्रपक्षांना विनंती करणार असल्याचे पवार म्हणाले होते. तसंच आम्ही जिंकलेल्या जागा आम्हीच लढवणार अशी भूमिकाही पवार यांनी घेतली. त्यामुळे अप्रत्यक्षपणे भंडारा-गोंदियाची जागेवर राष्ट्रवादीने हक्क सांगितल्याची चर्चा सुरु झाली. त्यानंतर काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि आज नाना पटोले यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं.