व्यापारी संकुलाच्या नावाखाली प्रशासकीय इमारतीचे बांधकाम ?

नगर परिषद इमारत बांधकामाचा विरोध डावलून सत्ताधाऱ्यांनीच केला ठराव !

प्रतिनिधी । वरणगांव

वरणगाव नगर परिषद स्थलांतराचा विषय विधान सभेतही मांडला गेला. यामुळे स्थानिक सोशल मिडीयावर याबाबत चांगलीच चर्चा रंगली असून नविन नगर परिषद प्रशासकीय इमारतीचा ठराव सत्ताधार्‍यांनीच विरोधी नगरसेवकांचा विरोध डावलून सर्वानुमते मंजुर केल्याचे इतिवृत्तात नमुद केल्याचे समोर आले आहे.

 

वरणगांव नगर परिषद कार्यालय स्थलांतराच्या कारणावरून शहरात चांगलाच आखाडा गाजत आहे. स्थलांतराला विरोधी कृती समितीने चांगलाच विरोध दर्शवल्याने त्याचे पडसाद विधान सभेतही उमटून आ. संजय सावकारे यांनीही विरोधी कृती समितीच्या खांद्याला खांदा लावुन स्थलांतर करण्यात येवु नये अशी मागणी विधान सभा अध्यक्षांकडे केली. यामुळे स्थलांतराला पूर्णविराम मिळणार असलातरी नगर परिषद कार्यालय स्थलांतर करण्याचा विषय कुणी व का? केला याबाबत चर्चा रंगु लागली आहे. यामध्ये दि. ०४ / ०५ / २०१६ रोजी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाच नगरसेवकांनी केलेला विरोध डावलून नगर परिषद कार्यालय स्थलांतराचा ठराव बहुमताने मंजुर केल्याची सभेच्या इतिवृत्तात नोंद करण्यात आली असल्याचे दिसुन येत असल्याने हा विषय नगर परिषदेच्या निवडणूकीत चांगलाच गाजणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 

*व्यापारी संकुलाच्या भुमिपुजनाला हजेरी*

शहरातील शासकीय विश्राम गृहालगतच्या सि. स. ३०७६ ( स. नं. ४१२ / अ ) मध्ये नगर परिषदेच्या व्यापारी संकुलाचे भुमिपुजन असल्याचे कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाचही नगरसेवकांनी हजेरी लावली होती. असे राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी सांगितले.