ठेकेदाराकडून मनपा अधिकार्‍यांना पाकिटे

0
जळगाव। महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.36 मधील साफसफाई व स्वच्छतेचा ठेका मिळालेल्या ‘सहजिवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था’ यांच्याकडून प्रभागाची स्वच्छता व साफसफाई होत नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसची माजी प्रदेश सचिव विनोद देशमुख यांनी पालिकेच्या महासभेत तसेच मनपाकडे अनेक तक्रारी केलेल्या आहेत. यांसह मनपातील आयुक्त, उपायुक्त, आरोग्य अधिकारी यांना प्रत्यक्ष व सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारी देवून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र या तक्रारींमुळे संबंधित संस्था ही कारवाईत ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची लक्षणे दिसतांच संस्थेच्या संबंधित व्यक्तींनी आम्हाला आमिषे दाखवून तोडीपाणी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला असून सर्व पुरावे व व्हिडीओ चित्रीकरण सर्व पंतप्रधान व मुख्यमंत्री इंटरनेट पोर्टलवर टाकणार असल्याचीही माहीती श्री. देशमुख आणि वार्ड क्र. 36 च्या नगरसेविका अश्‍विनी विनोद देशमुख यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परीषदेत माहिती दिली. दरम्यान आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांच्या घरी बैठकीचे व्हिडिओ संभाषण आणि नगरसेविका ज्योती चव्हाण यांच्या घरी झालेल व्हिडीओ संभाषणाचा पुरावा नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांच्याकडे आहेत. याबाबत सोमवारी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे तक्रार करून साफसफाईचा ठेका रद्द करून संबंधित अधिकार्‍यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा अशी मागणी करणार असल्याचेही यावेळी श्री. व सौ. देशमुख यांनी सांगितले.
प्रभागाची साफसफाई न करता बिले होतात मंजूर
तक्रारी थांबविण्यासाठी तोडीपाणीचा विषय आल्यानंतर हा प्रकार धक्कादायक आणि महानगरपालिकेची फसवणूक करणारा व पर्यायाने जनतेची फसवूक करणार असल्याने स्वच्छतेचा ठेका घेवून प्रभागाची साफसफाई न करता बिले मंजूर करून स्वतःचे हित साधणार्‍यांचा पर्दाफाश करण्यासाठी विनोद देशमुख व नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांनी स्टिंग ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतल्यांनंतर ‘सहजिवन स्वयंरोजगार सहकारी संस्थेच्या’ संबंधितांच्या आर्थिक सेटलमेंटच्या चर्चेत त्यांच्या निरोपावरून सहभाग घेतला. मात्र या मनपा अधिकार्‍यांपासून ते काही नगरसेवक हे ठेकेदारांच्या आर्थिक हितासाठी कार्यरत असल्याचे समोर आले. यावेळी याठिकाणी झालेली चर्चेचे चित्रीकरण करण्यात आले होते. झालेला प्रकार 31 जानेवारी 2017 रोजी मनपा प्रशासन प्रमुख आयुक्त जिवन सोनवणे यांना दिली आणि त्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष करून मला मुंबईला जात असल्याचे सांगून टाळाटाळ केली. दुसर्‍यांदा 30 मार्च 2017 रोजी व्हिडीओ क्लिप बघा व कारवाई करा अशी मागणी केल्यानंतरही पुन्हा टाळण्याचा प्रयत्न केला.
आयुक्त व महापौरांचे दुर्लक्ष; मात्र धमकवण्याचा प्रयत्न
यावेळी नगरसेविका अश्‍विनी देशमुख यांनी सांगितले की, आयुक्तांना दोनवेळा व्हिडीओ क्लिप बघण्याची विनंती करूनही कोणताही प्रतिसाद मिळाल्या नसल्यामुळे मी स्वतःच हा व्हिडीओ क्लिप मनपा सभागृहात दाखविण्याचे जाहीरपणे सांगितले. त्यानुसार 24 मार्च 2017 रोजी आयुक्तांकडे आणि 24 एप्रिल 2017 रोजी महापौर यांना लेखी निवेदनाद्वारे व्हिडीओ क्लिप दाखविण्यासाठी प्राजेक्टची मागणी केली. परंतू यालाही परवानगी मिळाली नाही. यावरून असे सिद्ध होते की, व्हिडीओ क्लिप वरून सहजीवन संस्था आणि त्यांच्याशी संबंधितांचे बिंग फुटणार असल्याची जाणीव झाल्याने मी व माझे पती यांचेवर ठेकेदाराचे प्रतिनिधी यांनी पत्रकार परीषद घेवून निंदनीय आरोप केले व ‘नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा’ असे पालिकेसमोर मोठे होर्डींग लावले तसेच नितीन सपके यांने आपल्या माजी नगरसेवक मेहूण्याची भीती दाखवून धमकवण्याचा प्रयत्न सुरू ठेवले आहे.
काय आहे साफसफाई घोटाळा?
  • जळगाव महानगरपालिकेच्या हद्दी आज 22 प्रभागांचा समावेश असून त्यांचे साफसफाई व स्वच्छतेचे ठेके ‘सहजिवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था’ यांना दिलेले आहे.
  • या संस्थेला एका प्रभागातील साफसफाई करण्यासाठी 2 लाख 78 हजार रूपये दरमहा रकमेचा ठेका देण्यात आलेला आहे. त्यासाठी संस्थेला साठी आरोग्य विभाचे पत्र 12 ऑगस्ट 2016 रोजी देण्यात आले आहे.
  • साफसफाईचा ठेका मिळाल्यानंतर काही दिवसातच प्रभाग क्र. 36 च्या स्थानिक नागरीकांनी साफसफाई व स्वच्छतनेबाबत तक्रारी सतत यायला लागले. त्यामुळे प्रभागाच्या पाहणीत सत्यता पाडताळून पाहिल्यानंतर सहजिवन विरूद्ध तक्रार केली त्यानंतर आत्तापर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही.
  • तब्बल 3 हजार 500 पेक्षा जास्त तक्रारी केलेल्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार उपायुक्त, आरोग्य अधिकारी, दोन आरोग्य निरीक्षक यांनी प्रभाग क्र. 36 मध्ये साफसफाई व स्वच्छतेची पाहणी केली त्यात त्यांना प्रभागात 5 ते 6 मजूर कामावर आढळून आले असा अहवाल सुद्धा अधिकार्‍यांनी दिला आहे.
  • सातत्याने केलेल्या तक्रारींवरून महापालिकेने सहजिवन या संस्थेला नोटीसा बजावल्या होत्या त्या नोटीसांना महापालिकेला संस्थेने केराची टोपी दाखविली आहे.
  • व्हिडीओ क्लिप सार्वजनिक होण्याच्या भितीने संस्थेने मनपाला खुलासा सादर केला मात्र तो खुलासा आरोग्य निरीक्षकांनी फेटाळून लावला असून याची टिपणी वरीष्टांकेड सादर केली.
  • यानंतर आयुक्तांच्या आदेशावरून उपायुक्तांनी सहजिवन या संस्थेचा ठेका रद्द करून ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचे आदेश 8 जून 2017 रोजी दिले व सदर संस्थेला म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आलेली नाही असे सांगत तो आदेश मागे घेतला. यावरून प्रशासन अधिकारी यांचे ठेकेदाराशी आर्थीक संबंध असल्याचे दिसून येत आहे.
अधिकारी व नगरसेवक कसे होतात मॅनेज?
एका प्रभागातील साफसफाई करण्यासाठी 2 लाख 78 हजार रूपये दरमहा रकमेचा ठेका दिला जातो. एका वार्डातून आयुक्तांना 30 हजार, उपायुक्तांना 25 हजार, आरोग्य अधिकारी यांना 20 हजार तर दोन आरोग्य निरीक्षकांना प्रत्येकी 15 हजार आणि नगरसेवकांना 10 हजार असे पाकीट ठेकेदारामार्फत दिले असेही आरोप यावेळी पत्रकार परीषदेत केले गेले.
मॅनेज होण्यासाठी इतरांकडून सांगावा
सहजिवन संस्थेचे ठेकेदार यांनी पैसे घ्या अन् मॅनेज व्हा असा सांगावा इतरांच्या मदतीने नगरसेविका अश्‍विनी देशमुख व विनोद देशमुख यांना आला. त्यानुसार त्यांनी मनपा कर्मचारी बाळासाहेब चव्हाण आणि नगरसेविका ज्योती चव्हाण यांच्या घरी बैठक घेवून ठेकेदार व बाळासाहे चव्हाण यांनी दरमहा 10 हजार रूपये घेण्याचे ऑफर देत भागीदार व्हा असे सांगितले असल्याची माहिती पत्रकार परीषदेत श्री. व सौ. देशमुख यांनी दिली. यावेळी प्रभाग 29 चा ठेक्यातील भागीदार नितीन सपके असल्याचे चर्चेत आले.
उपायुक्त कहार व आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांचा पोलखोल
यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. विकास पाटील यांनी आम्हाला बोलावून त्यांच्या भ्रमणध्वनीवरून उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांचेशी फोनवर बोलणे करून दिल्यानंतर त्यांनी सांगितले की, तुम्ही जरी पुराव्याने तक्रारी केल्या असल्या तर त्या तक्रारी आम्ही नाकारू शकतो, तुम्ही कशाला विरोधात जाताय, जसे चालले आहे तसे चालू द्या, बाकी आरोग्य अधिकारी तुम्हाला सांगतीन, असे सांगितल्यानंतर आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांनी चर्चा करण्यासाठी बोलावून ठेकेदाराला 10 हजार रूपयांऐवजी 15 हजार रूपये देण्याचे सांगितले. तसेच नगरसेविका ज्योती चव्हाण व बाळासाहेब चव्हाण यांच्या घरी बोलावून 15 हजार रूपये तुमच्या घरी पोहचविण्याची जबाबदारी आमची असल्याचे चव्हाण यांनी देशमुख यांना सांगितले.

Web Title- contractor gives bribe to officers