मनपा अधिकार्‍यांकडून पाच लाखांची डिमांड

0

घर हडप करण्याचा नगरसेवक कैलास सोनवणे यांचा प्रयत्न – गायकवाड

अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार – कैलास सोनवणे यांची माहिती

जळगाव – आकाशवाणी चौकालगत जैन स्वाध्याय भवनजवळील गडकरीनगरातील एका दुमजली इमारतीची बाल्कनी आणि जिना बेकायदेशीर असल्याने महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सकाळी बांधकाम पाडले मात्र, या प्रकरणात मनपा अतिक्रम निर्मूलन पथकातील खान आणि पाटील यांनी 15 दिवसांपूर्वी प्रकरण मोडून काढण्यासाठी 5 लाख रुपये द्या, अशी मागणी केल्याचा गंभीर आरोप गोविंद पंडीतराव गायकवाड यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केला आहे. तसेच नगरसेवक कैलास सोनवणे हे पैशांच्या जोरावर जबरदस्तीने घर हडप करण्यासाठी प्रयत्न करत असून, न्याय न मिळाल्यास कुटुंबासह उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी गोविंद गायकवाड यांची पत्नी कल्पना, मुलगा प्रशांत, सून गायत्री यांच्यासह नातेवाईक जनार्दन राऊत, जयंत पाटील उपस्थित होते. गायकवाड यांनी बांधकाम संबंधीची कागदपत्रे , बांधकाम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र पत्रपरिषदेत सादर केले. माजी नगरसेवक कैलास सोनवणे हे घराचा ताबा मिळविण्यासाठी आर्थिक त्रास देत आहेत. माझ्या वडिलांचे वय 104 वर्षे असून, बळजबरीने त्यांना नेवून त्यांची स्वाक्षरी कागदपत्रांवर घेण्यात आल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला. वडिलांसोबत न्यायालयात सुरू असलेला वादही संपुष्टात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जीवितास बरे वाईट झाल्यास नगरसेवक सोनवणे जबाबदार
20 हजार रुपयांचेवर असलेले आर्थिक व्यवहार धनादेशाने केले जातात, सोनवणे म्हणतात त्यांनी लाखो रुपये रोख दिले यात तत्थ्य नाही. त्यांनी रोख रक्कमच दिलेली नाही. न्यायालयात जे कॅव्हेट दाखल केले आहे त्याची कॉपी आम्हाला दिली असून त्यावर दिनांक व शिक्का नाही. आमच्या जीवीतास काही बरेवाई झाल्यास त्यास कैलास सोनवणे जबाबदार असतील. 8 ऑक्टोबर 2015 रोजी सोनवणे यांच्या विरुध्द रामानंद नगर पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून त्याची नक्कल त्यांनी पत्रपरिषदेत दाखवली. न्याय मिळविण्यासाठी उपोषणास बसणार असुन ना.गिरिष महाजन यांची धमकी कैलास सोनवणे देत असल्याचा त्यांनी पुन्हा उल्लेख केला करत हे प्रकरण मिटविण्यासाठी मनपा अतिक्रमण अधिकार्‍यांनीही 5 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप त्यांनी केला.

अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार ः नगरसेवक कैलास सोनवणे
गेल्या दोन दिवसांपासून गायकवाड कुटुंबीय माझ्याविरुद्ध बदनामी करणारी माहिती माध्यमांमध्ये पसरवित आहेत. कोणताही ठोस पुरावा नसताना ते बेछूट आरोप करीत असल्याने माझी समाजात बदनामी होत आहे. माझ्या मालकीच्या मालमत्तेत जबरदस्ती वास्तव्य करून वकिलाकडून कायदेशीर नोटीस दिलेली असताना देखील ते घराचा ताबा न सोडता माध्यमांना चुकीची माहिती देऊन कोणताही ठोस पुरावा सादर करीत नाही. केवळ माझी बदनामी करण्याच्या उद्देशाने आणि होणारी कारवाई टाळण्यासाठी त्यांचा हा उद्योग सुरु आहे. माझी समाजात बदनामी केल्याने मी संबंधितांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे नगरसेवक कैलास सोनवणे यांनी सांगितले आहे.