मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसेंदिवस आपलाच रेकॉर्ड मोडताना दिसत आहे. कारण सर्वोच्च पातळी गाठलेल्या इंधन दरातील वाढ कायम आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच आहेत. कर्नाटक निवडणुकीनंतर सलग नवव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर वाढत आहेत. आज पेट्रोल ३३ पैशांनी तर डिझेल १५ पैशांनी वाढले आहे. इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होतो. त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर ८४ रुपये ७३ पैसे तर डिझेलचे दर ७२ रूपये ३६ पैसे झाले आहेत.
नवा उच्चांक गाठला
या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे. गेल्या ८ दिवसांपासून सतत होणाऱ्या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी हा नवा उच्चांक गाठला आहे. मागील चार आठवड्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सतत वाढत आहेत. कर्नाटक निवडणुकीच्या काही दिवस आधी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नव्हते.
आणखी दरवाढीची शक्यता
दुसरीकडे दिल्लीत पेट्रोल ७६.८७ रुपये तर डिझेल ६८ रुपये महागले आहे. दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे जे दर आहेत, ते भारताच्या आजपर्यंतच्या इतिहासात कधीही नव्हते. मनमोहन सिंह सरकारच्या काळात पेट्रोलने १४ सप्टेंबर २०१३ रोजी सर्वाधिक ७६.६ रुपयांचा दर गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर सातत्याने वाढत आहेत. सध्याचे दर २०१४ च्या तुलनेत जास्त आहेत. हे सर्व कच्च्या तेलाचा पुरवठा कमी झाल्याने होत आहे. येत्या काळात अमेरिकेने इराणवर काही निर्बंध लादले, तर पुरवठा आणखी घटेल आणि त्याचा फटका बसून, आणखी दरवाढ होईल.