सीबीआयला झटका; शरद कळसकरचा ताबा देण्यास कोर्टाचा नकार

0

मुंबई-मुंबईतील नालासोपारा येथून जप्त करण्यात आलेल्या स्फोटके आणि शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी शरद कळसकर याचा ताबा मिळवण्यात सीबीआयला अपयश आले आहे. दाभोलकर हत्याप्रकरणी चौकशीसाठी शरद कळसकरचा ताबा मिळावा यासाठी सीबीआयने सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्याने सीबीआयला झटका बसला आहे.

वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर आणि शरद कळसकर यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांकडून पोलिसांनी गावठी बॉम्ब, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे साहित्य, जिवंत काडतुसे जप्त केली होती. यातील शरद कळसकर हा मुळचा औरंगाबादचा रहिवासी आहे.

शरद कळसकरला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील चौकशीदरम्यान एटीएसला अनेक गोष्टींचा उलगडा झाला होता. त्यानुसार, इतर अनेक संशयीतांनाही ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी शरदचे कनेक्शन असल्याची माहिती तपास पथकांना मिळाली होती. दाभोलकर प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडे आहे. त्यामुळे या प्रकरणात चौकशीसाठी शरद कळसकरचा ताबा मिळावा यासाठी सीबीआयकडून सत्र न्यायालयात अर्ज केला होता.