नंदुरबार। शहरासह परिसरात थंडीमुळे हुडहुडी वाढू लागली आहे. अशातच ट्रक चालकांना ब्लँकेटचे वाटप करून मोटर मालक, कामगार, वाहतूक संघटनेमार्फत मायेची ऊब देवून सृजनशील असा उपक्रम राबविला. उत्तर महाराष्ट्र ट्रक असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सरदार ट्रान्सपोर्टचे संचालक स्व. दीपक रघुवंशी यांच्या चौथे पुण्यस्मरणनिमित्त ब्लँकेटचे वाटप मोटर मालक, कामगार, वाहतूक संघटनेचे राज्याध्यक्ष सचिन जाधव यांच्या हस्ते संघटनेच्या कार्यालय परिसरात करण्यात आले.
ट्रक चालकांना थंडी असो वा पावसाळा कधीही कुठेही जावे लागते. रात्री-बेरात्री रस्त्यावर गाडीत मुक्काम करावा लागतो. थंडीत कुडकुडत बसावे लागते. अशा 52 चालकांना ब्लँकेटचे वाटप केल्याचे मोटर मालक, कामगार, वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमन रघुवंशी यांनी सांगितले. यावेळी मोटर मालक, कामगार, वाहतूक संघटनेचेे जिल्हाध्यक्ष अमन रघुवंशी, ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्टचे जिल्हाध्यक्ष महेश रघुवंशी, अमित रघुवंशी, चालक जाकीर पठाण, रहीम पिंजारी, कोमल राजपूत आदी उपस्थित होते.