मू.जे.महाविद्यालयातील खूनामागचे नेमके कारण पोलिसांच्या चौकशीत आले समोर ; पुण्यातून अटक केलेल्या संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडीत
जळगाव : मूळजी जेठा महाविद्यालयात भर दिवसा विद्यार्थी मुकेश मधुकर सपकाळे (23, रा.आसोदा) याच्यावर चॉपरने हल्ला करुन त्याचा खून झाल्याची घटना 29 रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अद्यापर्यंत सहा संशयितांना अटक केली त्यांच्याकडून चौकशीत मुकेशच्या खूना मागील नेमक्या कारणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. अटकेतील संशयितांनी खूनाच्या चार ते पाच दिवसांपूर्वी सध्या बहुचर्चित असलेला कबीर सिंग हा हिंदी चित्रपट बघितला. चित्रपटाप्रमाणे किरण हटकरला दशहत निर्माण करायची होती, त्यासाठी आधीच दशहत असलेल्या लिंबू राक्या गुन्हेगाराचा खून करायचा डाव रचला. ठरल्याप्रमाणे निंबू राक्याला मारण्यासाठी किरणसह अटकेतील सर्व संशयित 29 रोजी मू.जे. महाविद्यालयात पोहचलेही, मात्र त्यापूर्वी दुचाकीचा धक्का लागल्याचा कारणावरुन मुकेशसोबत वाद वाद झाला. व याच किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत मुकेश सपकाळेचा खून झाल्याची माहिती चौकशीत समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
केवळ राग अनावर झाल्याने किरणने केले मुकेशवर वार
पोलिसांच्या चौकशीनुसार मुकेश मधुकर सपकाळे व संशयितांमध्ये कुठलाही वाद किंवा वैमनस्य नव्हते. 29 रोजी मु.जे.महाविद्यालयात संशयित दुसर्याच मारण्याच्या तयारीत आले होते. किरणच्या सोबत चॉपरही होते. मात्र याच दरम्यान इच्छाराम वाघोदेचा दुचाकीचा धक्का लागल्यावरुन रोहित सपकाळेशी वाद झाला, वादानंतर रोहितने मुकेशला तर इच्छारामने किरण हटकरसह इतरांना बोलावले. याठिकाणी किरकोळ वादातून राग अनावर झाल्याने किरण हटकरने मुकेशवर सपासप वार केले. व त्यातच त्याचा मृत्यू झाला. रोहितने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यावर किरणने संतापाच्या भरात वार केले मात्र ते रोहितने चुकविल्याने तो वाचला. केवळ दुचाकीचा धक्का लागून वादाचे निमित्त ठरले. व त्यातून निष्पाप मुकेशचा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे.
‘किरण’ला महाविद्यालयात करायची होती दहशत निर्माण
लिंबू राक्याची महाविद्यालयात दशहत होती, महाविद्यालयात केवळ आपलीच दहशत असावी म्हणून मार्गातला लिंबू राक्याचा काटा काढायचा निर्णय किरणने घेतला. याचदरम्यान किरणने त्याच्या चार मित्रांसमवेत सध्या बहुचर्चित असलेला कबीर सिंग हा चित्रपट बघितला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेल्या शाहीद कपूरच्या जागेवर स्वतःला बघितले. अन् लिंबू राक्याला मारण्याचा डाव ठरला. चित्रपटानंतर दोन दिवसांनी लिंबू राक्या मू.जे.महाविद्यालयाची असल्याची खबर किरणला मिळाली. अन् किरण सोबत चॉपर घेत त्याच्या साथीदारांसमवेत महाविद्यालयात पोहचला. लिंबू राक्याविषयाची राग त्याच्या मनात होतात, या रागात असताना सपकाळेसोबत वाद झाला, किरणकडून संतापात मुकेशवर वार झाले व त्याचा मृत्यू झाला.
पोलीस अधीक्षकाचेही होते तपासावर लक्ष केंद्रीत
भरदिवसाच्या खूनाच्या घटनेने शहर हादरले होते. पोलीस दलाच्या कार्यक्षमेतवर प्रश्न उपस्थित होत होते. त्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी सर्व माहिती घेवून स्वतः गुन्ह्याच्या तपासावर लक्ष केंद्रीत केले. अधीक्षक उगले यांनी विजय पाटील, नरेंद्र वारुळे यांना तांत्रिक माहितीसाठी तर सहायक फौजदार आनंदसिंग पाटील व भास्कर पाटील यांना जळगाव ते पुणे संपर्कासह हालचालींसर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविली होती. याचदरम्यान मुकेशवर वार करणारे, किरणसह संशयित पुण्याला रवाना झाल्याची माहिती विजयसिंग पाटील यांना मिळाली. यानंतर पोलीस अधीक्षकांनी पाटील यांना स्वतः बोलावून घेत त्यांच्याकडून माहिती घेतली व त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरिक्षक सागर शिंपी, विनोद पाटील, अनिल देशमुख व किरण धनगर यांचे पथक पुण्यात रवाना केले.
प्लंबर असल्याचे सांगून संशयितांना केली अटक
पोलिसांच्या हाती लागू नये संशयितांनी शकली लढविल्या. घटनास्थळाहून निघाल्यानंतर संशयितांनी मोबाईल बंद करण्यापूर्वी एकमेकांना पुणे, मनमाडला जात असल्याचे संभाषण केले. व यानंतर सर्वांनी एकाच वेळी मोबाईल बंद केले. माहितीनुसार विजयसिंग पाटील यांच्यासह पथकाने संशयित ज्यांच्याकडे गेले होते त्या विद्यार्थ्यांचे सिंहगड येथील घर गाठले. अन् संशय येवू नये म्हणून प्लंबर असल्याचे सांगून दरवाजा ठोकला. दरवाजा उघडताच घरातील किरण हटकर, अरुण बळीराम सोनवणे, तुषार नारखेडे, मयुर माळी व समीर शरद सोनार यांना ताब्यात घेतले. रविवारी मध्यरात्री पथक त्यांना ताब्यात घेवून जळगावला पोहचले.
पाचही संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी
किरण अशोक हटकर (वय 20, रा. नेहरु नगर), अरुण बळीराम सोनवणे (वय 23, रा. आंबेडकर चौक, समता नगर), मयूर अशोक माळी (वय 18, रा. जाकीर हुसेन कॉलनी, महाबळ), समीर शरद सोनार (वय 19, रा. फॉरेस्ट कॉलनी, रिंग रोड) व तुषार प्रदीप नारखेडे (वय 19, रा. यशवंत नगर) हे पाच जणांना पथकाने पुण्यातून ताब्यात घेतले. सोमवारी जळगाव गाठल्यावर दुपारी 1 रोजी न्या. डी.बी. साठे यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच ही जणांना 5 जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड. भागवत पाटील यांनी काम पाहिले.
न्यायालय परिसरात बंदोबस्त
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सकाळी संशयितांना पोलीस बंदोबस्तात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले होते. येथे वैद्यकीय तपासणी पुर्ण होत पुढील कायदेशीर प्रक्रिया पार पाडत पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले. या ठिकाणी बंदोबस्तात संशयितांना आणण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयात कामकाज सुरु असतांना न्यायालय आवारात पोलिसांचे पथक तैनात होते. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर न्यायालयाच्या मागील बाजुच्या गेटने संशयितांना रवाना करण्यात आले. दरम्यान रामानंद पोलीस स्टेशनला पोलीस अधीक्षकांसह तपास अधिकारी सचिन बेंद्रे यांनी संशयितांची तपासाच्या दृष्टीकोनातून कसून चौकशी केली.