चोरीच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच स्टुडिओतून चोरला कॅमेरा

0

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेच एमआयडीसीच्या गुन्ह्यात घेतले होते ताब्यात ; कॅमेरा विक्रीला गेला अन् अडकला जाळ्यात

जळगाव- कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या एका दुकानात दुकानदाराचे लक्ष नसतांना गल्ल्यातून तीन हजार रूपये लांबविल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात अक्षय प्रकाश छाडेकर (वय 21) रा. पहूर पाळधी ता.जामनेर याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती. दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर अक्षय जामीन बाहेर पडला. अन् त्याच सायंकाळी शहरातील देशपांडे मार्केटमधील पुष्पक स्टुडिओतून 70 हजार रुपये किमतीचा कॅमेरा चोरला होता. हा चोरीचा कॅमेरा विक्रीसाठी अक्षय पहूरला गेला अन् पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला. त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

एमआयडीसीच्या गुन्ह्यात दोन दिवस कोठडी
कृषी उत्पन्न बाजार समिती भाजीपाला मार्केटमध्ये फिर्यादी दिपक किसन स्वामी यांचे दुकान आहे. या दुकानावर पाण्याचे जार, थरमास याची विक्री केली जाते. या दुकानाच्या गल्ल्यातील तीन हजार रूपये चोरी झाले होते. दुकानातील सीसीटीव्ही फुटेजवरुन चोरीचा प्रकार समोर आला होता. याबाबत एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय छाडेकर ला 14 रोजी पहूर पाळधी येथून अटक केली. न्यालयात हजर केल्यावर त्याला 16 पर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी झाली होती.

जामीनावर सुटताच सायंकाळी चोरला कॅमेरा
16 रोजी पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर अक्षयला न्यायालयात हजर केल्यावर जामीन मंजूर झाला. यानंतर 17 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास शहरातील देशपांडे मार्केटमध्ये असलेल्या विजय पूना बारी रा.विठ्ठलपेठ यांच्या पुष्पक स्टुडिओतून संशयित अक्षय छाडेकरने ने निकॉन कंपनीचा 70 हजार रुपये किमतीचा कॅमेरा चोरला होता. याबाबत दुकानदारालाही माहिती नव्हती.

कॅमेरा विकायला गेला अन् जाळ्यात
अक्षय कॅमेरा चोरल्यावर त्याच्या गावी गेला. याठिकाणी हा कॅमेरा तो पहूर येथील एका जणाकडे विकण्यासाठी घेवून गेला. याची गोपनीय महिती स्थानिक गुन्हे शाखेचे विजय शामराव पाटील यांना मिळाली. त्यांनी पोलीस निरिक्षक बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली रा.का.पाटील सचिन, महाजन, विनोद सुभाष पाटील, दादाभाऊ पाटील या पथकासह अक्षयला पहूर येथून अटक केली. चौकशीत अक्षय कॅमेरा मित्राचा असल्याचा सांगत होता. खाकी दाखविल्यावर त्याने कॅमेरा जळगावातून चोरल्याची माहिती दिली. शहरात आणल्यावर त्याने पुष्पक स्टुडिओतून चोरल्याचे सांगितले. विशेष म्हणजे स्टुडिओमालकाही कॅमेरा चोरीची खबर नव्हती. अक्षयने सांगितल्यावर प्रकार समोर आला. यानंतर 18 रोजी बारी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयला जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.