मोदींवर स्तुती अन् टीकाही!

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी स्तुती आणि टीका अशा दोन्ही परस्परबाबींना सामोरे जावे लागले. मोदींवर लिहिण्यात आलेल्या एका पुस्तक प्रकाशन समारंभात रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मोदींच्या कामाची जोरदार स्तुती केली. मोदींसाठी काहीही अशक्य नाही, तेच आता देशासाठी आशेचा किरण आहेत, असे सरसंघचालक म्हणाले. तर काश्मीरनीतीवरून काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार टीकास्त्र डागत, त्यांच्या काश्मीरविषयक धोरणामुळेच निरपराध लोकांचे नाहक रक्त सांडत आहे. दहशतवाद्यांना हिंसक होण्यासाठी मोदीच संधी देत आहेत, असा आरोपही गांधी यांनी केला.

मोदींचे निर्णय देशहिताचे!
राजधानी नवी दिल्लीतील मावलंकार सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर लिहिण्यात आलेल्या ‘द मेकिंग ऑफ ए लिजंड‘ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याहस्ते झाले. यावेळी बोलताना संघप्रमुख म्हणाले, की मोदी हे कोणत्याही बडेजावमध्ये कधीच फसले नाहीत. काही नेते असे असतात ते घाबरून काम करतात. परंतु, जे कामाप्रती श्रद्धा ठेवतात ते निडर होऊन काम करत असतात. आणि जयजयकार देखील अशाच नेत्यांचा होत असतो. पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा संघर्ष खूप मोठा आहे. ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हाही जगाच्या नजरा त्यांच्याकडे होत्या. आता ते पंतप्रधान झाले तरी जगाच्या नजरा त्यांच्यावर खिळलेल्या आहेत. समाजाला त्यांचे सुखदुख समजणारा ठेकेदार हवा होता. आता तसा ठेकेदार समाजाला मिळाला आहे, मोदी जे निर्णय घेत आहेत, ते देशहिताचेच आहेत, असे गौरवोद्गारही डॉ. भागवत यांनी याप्रसंगी काढले. याप्रसंगी भाजप अध्यक्ष अमित शहा यांचीही उपस्थिती होती. त्यांनीही मोदींच्या अनेक पैलूंना उपस्थितांसमोर प्रगट केले.

काश्मीरची रणनीती फसलेली!
अमरनाथ यात्रेकरुंवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्विटरद्वारे जोरदार टीकास्त्र जागले. मोदींच्या काश्मीर धोऱणामुळेच या भागात दहशतवाद फोफावलेला आहे. काश्मीरची फसलेली रणनीती हा भारतासाठी रणनैतिक मोठा झटका आहे. मोदींनी स्वार्थ पाहात, पीडीपीसोबत सत्तेची आघाडी केली. परंतु, त्याचे गंभीर परिणाम आता देश भोगतो आहे. या प्रदेशात निरपराध नागरिकांचे जे रक्त सांडत आहे, त्याला केवळ अन् केवळ मोदीच जबाबदार आहेत, असा आरोपही खा. गांधी यांनी केला.

Web Title- Criticise and praise for Modi