पुरी:बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला फनी हा चक्रीवादळ ओडीशा राज्यातील पुरीच्या किनारपट्टीवर धडकलेल्यानंतर आता पश्चिम बंगालच्या दिशेने सरकू लागले आहे. मुसळधार पाऊस आणि वेगवान वादळामुळे पुरीच्या किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पावसाळ्यापूर्वीच हे वादळ कसे काय आले याचे तज्ज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
फनी चक्रीवादळामुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी भारतीय नौदलाच्या P-8I आणि डॉर्नियर आज दुपारी लॉन्च केले जाणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्येही फनी चक्रीवादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. राज्यात तैनात एनडीआरएफच्या पथकाने दत्तापूर आणि ताजपूरमधून १३२ लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. यात ५२ मुलांचा समावेश आहे.
दिल्लीतील हवामान विभागातील मृत्युंजय मोहापात्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ तासांमध्ये फनी चक्रीवादळाचा वेग मंदावणार आहे. तीन तासांनंतर चक्रीवादळाचा वेग १५० ते १६० प्रति किमी इतका राहणार आहे. या नंतर फनी उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेकडे वळणार आहे. आज संध्याकाळच्या सुमारास ते तीव्र चक्रीवादळाच्या रुपात उत्तर ओडिशाच्या आणखी वर सरकणार आहे. सध्या फनी आंध्र प्रदेशापासून दूर सरकले असून डी- वॉर्निंग जारी करण्यात आल्याचे मोहापात्रा म्हणाले. आंध्र प्रदेशाच्या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याचेही ते म्हणाले. आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्याच्या इच्छापूरमध्ये वादळी पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. येथील लोकांनी शिबिरांमध्ये आश्रय घेतला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, श्रीकाकुलममध्ये पुढील १२ तास हीच स्थिती असणार आहे.