उद्योजक मंगेश चव्हाण यांच्या दातृत्वातून पोकलँड
चाळीसगांव – तालुक्यातील दहीवद येथील गावालगत असलेल्या तिन्ही पाझर तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने भर पावसाळ्यात दरवर्षी भरणार्या पाझर तलावात क्षमतेपेक्षा कमी पाणीसाठा साचत होते. गावालगत तीन पाझर तलावअसून देखील भर उन्हाळ्यात चार पाच दिवसात गावाला पाणीपुरवठा होत असल्याने ही संभाव्य पाणीटंचाई भविष्यात कायमची दूर व्हावी यासाठी आज दहीवद ग्रामस्थांनी जमवलेली तमाशा वर्गणी रुपये १ लाख ४० हजार व गावातील लोकसहभाग यातून या तिन्ही पाझर तलावांचा गाळ उपसण्याचा निर्णय घेतला. यासाठी उद्योजक मंगेश चव्हाण यांनी मोफत पोकलँड मशीन उपलब्ध करून दिल्याने लवकरच या तिन्ही तलावातील पाणी क्षमता वाढणार आहे यामुळे भविष्यात दहिवद गावाला दररोज पाणीपुरवठा होणार आहे.
दहिवद गावाची लोकसंख्या आठ हजार आहे. सधन शेतकरी गावकर्यांचे गाव म्हणून चाळीसगाव तालुक्यात दहिवद गावाचा वेगळा राजकीय सामाजिक शैक्षणिक दबदबा आहे. या गावाला लागून तीन मोठे तलाव आहेत. हे पाझर तलाव दरवर्षी पावसाळयात भरतात. मात्र यामध्ये तलाव निर्मितीपासून गाळ काढण्यात आलेला नाही. त्यामुळे या तलावांमध्ये पाणी साठवण्यासाठी खोली शिल्लक राहिलेली नाही. ही बाब सरपंच सुरेखा पवार, माजी सरपंच भिमराव पवार उपसरपंच भीमराव खलाणे यांच्या लक्षात आली. त्यांनी याबाबत गावकर्यांशी चर्चा करून या तिन्ही तलावांच्या खोली करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे यासाठी सर्वांच्या लोकसहभागाची गरज आहे असा प्रस्ताव मांडला. याप्रसंगी तालुक्यात ज्या ठिकाणी पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रसंगी उद्योजक मंगेश चव्हाण हे आर्थिक मदत करत असल्याची बाब समोर आली. त्यांनी मंगेश चव्हाण यांच्याकडे आमच्या तिन्ही पाझर तलाव खोलीकरण करण्याचा प्रस्ताव ठेवत आम्हाला पोकलँड उपलब्ध करून द्यावे असा विचार ठेवला. या अनुषंगाने उद्योजक मंगेश चव्हाण यांनी आज हा पोकलँड त्यांना त्यांच्या तलावातील खोलीकरण पूर्ण होईपर्यंत उपलब्ध करून दिला आहे. आपण गावकर्यांनी या गावात या पोकलँडसाठी डिझेलचा खर्च करावा. तरीही काही कमी अधिक आर्थिक मदत लागली तर मी करण्यास तयार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
तमाशा वर्गणी डिझेल खर्चासाठी
दरवर्षी ग्रामीण भागामध्ये यात्रा प्रसंगी तमाशाचा कार्यक्रम आयोजित केला जातो ही परंपरा आहे. यासाठी गावात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वर्गणी जमा केली जाते. अशाच प्रकारे दहीवद गावात देखील १ लाख ४० हजार रुपये वर्गणी जमा झाली होती. आज या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी माजी सरपंच भिमराव पवार व सरपंच पवार यांनीही वर्गणी डिझेल करण्यासाठी वापरावी अशी सूचना मांडली. उपस्थित सर्व गावकर्यांनी एकमताने या सूचनेला पाठिंबा दिल्याने जळगाव जिल्ह्यात अशा पद्धतीची तमाशा वर्गणी विधायक कामासाठी खर्च करणारे दहीवद हे एकमेव गाव ठरले आहे. यावेळी माजी सरपंच भीमराव पवार यांनी स्वतःचे १० हजार रुपये, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख तथा उपसरपंच भीमराव खलाणे यांनी ५ हजार, बळवंत वाघ यांनी ५ हजार अशा पद्धतीने अनेक दहीवदगावकरांनी लोकसहभागातून मदत करण्याचे जाहीर केले.
यांची होती उपस्थिती
आज सकाळी १० वाजता या नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच सुरेखा पवार, माजी सरपंच भिमराव पवार शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख उपसरपंच भीमराव खलाणे, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर वाघ, बळवंत वाघ,चींधा वाघ, एकनाथ पवार, एकनाथ खालाणे,नितीन बागुल, तानाजी जाधव, अनमोल नानकर, उत्तम कोळी, मुरलीधर वाघ, रतन पाटील, गोरख पवार, अनिल सोनवणे, हेमराज पाटील, पिंगळे सुदाम घोडे, बाबाजी मोरे, शिवाजी शितोळे, राजेंद्र पवार गावातील नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.