DAKC विक्रीला !

0

वाशी । अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स कम्युनिकेशनतर्फे (आरकॉम) कंपनीवरील कर्जाचा वाढता बोझा घटविण्यासाठी मुंबई व दिल्लीतील मालमत्ता लवकरच विक्रीस काढल्या जाणार आहेत. ‘आरकॉम’वर 45 हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज डिसेंबर 2017 अखेर 20 टक्क्यांपर्यंत घटविण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. मुंबई, दिल्लीतील मालमत्ता विक्रीतून कंपनीला 11 हजार कोटी रुपये मिळू शकतील. या विक्रीस प्रस्तावित मालमत्तात नवी मुंबईतील 133 एकर धीरूभाई अंबानी नॉलेज कॉम्प्लेक्सचाही (डीएकेसी) समावेश आहे.

नवी मुंबईतील डीएकेसी आयटी पार्क हा महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा लँडमार्क समाजाला जातो. ‘आरकॉम’ने दोन वर्षांपूर्वीच आपल्या स्थावर मालमत्ता विक्रीचा निर्णय घेतला होता. मात्र, ही डील काही कारणाने होऊ शकली नव्हती. आता ‘एअरसेल’सह आपला वायरलेस व्यवसाय विलीन करणे; तसेच कॅनडातील ‘ब्रुकफिल्ड’ला आपला मोबाईल टॉवर व्यवसाय विकण्यातून कंपनीला 25 हजार कोटी रुपये मिळतील. हे व्यवसाय विलीनीकरण-विक्री आणि डीएकेसी व नवी दिल्लीतील कनॉट प्लेस या मुख्य व्यावसायिक भागातील मालमत्ता विक्री यातून एकूण 36 हजार कोटी रुपये उभे राहतील. त्यामुळे ‘आरकॉम’वरील 45 हजार कोटींचे कर्ज घटून अवघे 9 हजार कोटी इतकेच राहील.

काही सूत्रांच्या मते, ‘डीएकेसी’ची विक्री करण्याऐवजी संयुक्त विकसकाचाही ‘आरकॉम’तर्फे शोध सुरु आहे. रहिवाशी भागासह एकूण एक कोटी 30 लाख स्क्वेअर फूटपर्यंत (13 मिलियन) हे आयटी पार्क विकसित केले जाऊ शकते. चार वर्षांपूर्वी ऐलायन्स समूहाने चीनच्या डेलियन वांडा समूहाशी हैदराबादमध्ये एकूण 2 कोटी स्क्वेअर फूट (20 मिलियन) बांधकाम प्रकल्पचा करार केला आहे.

नवी मुंबईत सध्या व्यावसायिक क्षेत्रातील जमिनीचे दार 10 कोटी रुपये प्रति एकर इतके आहेत. 2015 मध्ये रिअल इस्टेट डेव्हलपर के रहेजा कॉर्प यांनी घणसोली परिसरात 30 एकर जागा 7 कोटी रुपये भावाने 210 कोटीत खरेदी केली होती. याच भागात 2016 मध्ये ‘रहेजा’ने मफतलाल ग्रुपकडून 62.25 एकर जागा 355 कोटीत अधिग्रहीत केली होती.

काय आहे ‘डीएकेसी’त
12 कार्यालयीन इमारती
दोन प्रीमियम इमारती
सहा लाख स्क्वेअर फूट
मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये 7 इमारती
250 सूटचे गेस्ट हाऊस

दिल्लीतील मालमत्ता
महाराजा रणजित सिंह मार्गावरील रिलायन्स सेंटर (जुने हॉटेल रणजित)
3.7 एकर, अंदाजित मूल्य 800 कोटी रुपये
318,759 स्क्वेअर फूट बांधकाम, इमारती
‘आरकॉम’ची सब्सिडीरी काम्पिअन प्रॉपर्टीजची मालकी

45,000
कोटींचे एकूण कर्ज
11,000
कोटींची मालमत्ता विक्रीस
25,000
कोटी भागीदारीतून मिळणार
9,000
कोटी इतकेच राहील कर्ज
133
एकरचा आयटीपार्क परिसर