नवी दिल्ली – अयोध्येमध्ये रामलला मंदिराबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. आत्तापर्यंत मंदिरांमध्ये चोरीच्या घटना होत होत्या, मात्र आता घोटाळेदेखील होऊ लागले आहेत. ज्यांच्या नावावर सरकारे पडली आणि बनली देखील त्यांच्याच नावाने घोटाळा झाल्याचा खुलासा रामलला मंदिराच्या मुख्य महंतांनी केला आहे. रामललाच्या दानपेटीतील कोट्यवधी रूपयांच्या दागिण्यांचा घोटाळा झाला आहे.
आचार्य सत्येंद्र दास यांच्या या खुलाशाने अनेकांचे धाबे दणाणले आहे. हे कृत्य रामललाच्या कार्यालयात नेमण्यात आलेल्या बसंत लाल मौर्या या अधिकाऱ्यानेच केल्याचा आरोप आचार्य दास यांनी केला आहे. आचार्य सत्येंद्र दास यांनी सांगितले, की दानपेटीतून कोट्यवधी रुपयांचे दागिने गायब झाले असून २००० नंतरच्या अहवालांमध्ये दागिन्यांचा कोणताही उल्लेख नाही. आयुक्त कार्यालयात काम करणारा बसंत लाल मौर्या रामललाच्या दानपेटीत घोटाळा करून श्रीमंत बनला आहे.
आजच्या स्थितीत मौर्या कोट्यवधी रुपयांचा मालक आहे. याची तक्रार करूनही कोणतीही कारवाई केली जात नाही. मौर्याच्या जागेवर जेवढे अधिकारी आले, त्यांच्यावर मौर्या वरचढच राहिला आहे. त्यामुळेच तो देवाच्या घरात घोटाळा करण्यात यशस्वी झाला. या घोटाळ्याची तक्रार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्याकडे देखील करण्यात आलेली आहे. मात्र तरिही आत्तापर्यंत कोणतीच कारवाई केली गेली नाही.