वरणगांव नगर परिषदेचा भोंगळ कारभार – नागरीकांना निवडणूकीची प्रतिक्षा
वरनगाव l पाण्याचा काटकसरीने वापर करावा, पाणी अनमोल आहे असे नागरीकांना उपदेशाचे धडे देणाऱ्या वरणगांव नगरपरिषदेच्या दिव्या खालीच अंधार असल्याने दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे . तर दुसरीकडे नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने नगरपरिषद अधिकाऱ्यांचा भोंगळ व मनपानी कारभार संपुष्टात येण्यासाठी नागरीकांना निवडणूकीची प्रतिक्षा लागली आहे .
वरणगांव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी पात्रात मुबलक पाणी असुनही नगर परिषदेच्या भोंगळ व नियोजन शुन्य कारभारामुळे शहरातील नागरीकांना १२ ते १३ दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहे . परिणामी, नागरीकांना मोठ्या प्रमाणात पाण्याची साठवणूक करावी लागत असल्याने काही नागरीकांच्या साठवणूक केलेल्या पाण्यात जंतुचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसून येत आहे . तर नगर परिषद प्रशासनाकडून शहरातील नागरीकांना पाणी अनमोल असल्याने पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करा, पाण्याची नासाडी करू नका असे उपदेशाचे डोस दिले जात आहेत . इतकेच नव्हेतर जलवाहिनीला लागलेली गळती त्वरीत दुरुस्त करणे, पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरीकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पाणी पुरवठा होणाऱ्या प्रभागात नियुक्त केलेल्या समिती मधील कर्मचार्यांना फेरफटका मारून पाण्याच्या नासाडीवर नियत्रंण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत . मात्र, नगर परिषदेच्या दिव्या खालीच अंधार असल्याने सार्वजनिक जलवाहिनी वरून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे . यामुळे पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या नागरीकांमधून संताप व्यक्त केला जात आहे .
पाण्याच्या नासाडीला कारणीभुत कोण?
शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या डॉ . बाबासाहेब आंबेडकर नगर जवळील महीला व पुरुषांचे सार्वजनिक शौचालय आठ दिवसापूर्वी जमिनदोस्त करण्यात आले . यावेळी त्याठिकाणी असलेली जलवाहिनीही तुटल्याने आठ दिवसा पासुन मोठ्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे . तसेच नारी मळा व इतर भागातही हिच परिस्थिती असल्याने पाण्याच्या नासाडीला कारणीभुत कोण? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे . मात्र, नगर परिषदेत नियुक्ती असलेल्या परगावातील अधिकार्यांना याबाबतीत कुठल्याही प्रकारचे सोयर – सुतक वाटत नसल्याचे दिसून आहे . यामुळे त्यांनी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन न करता रजा टाकुन शहरवासीयांना वार्यावर सोडल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे .
सत्तेवर असुनही आंदोलन ?
भुसावळ सह तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे . यामुळे नागरीकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याने नगरसेवक व ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना नागरीकांच्या रोषाला सामोरे लागत आहे . यामुळे सत्ताधारी नगरसेवक व ग्रा.पं. सदस्यांनी शासकीय अधिकार्यांना आंदोलनाद्वारे वेठीस धरण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत . तर दुसरीकडे तालुका व जिल्हा पातळीवरील लोकप्रतिनिधी विविध निवडणूकांच्या नियोजनामध्ये व्यस्त दिसत असून मतदार संघातील पाण्याच्या समस्येकडे त्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरीक पाण्याने त्रस्त होत आहेत असे म्हटले जात आहे .यामध्ये अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना (पंचनाम्यांना विलंब ) तर पाणीटंचाईचा फटका नागरीकांना बसत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे .